Tue, Mar 19, 2019 09:14



होमपेज › Kolhapur › शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच! 

शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच! 

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 11:27PM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी 

शहरातील वर्दळीच्या रस्त्याप्रमाणे बिंदू चौक ते दसरा चौक या रस्त्यांवर अनेक अडथळ्यांमुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. वाहनांची वाढणारी संख्या, नियमांचे उल्‍लंघन आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे इतर रस्त्यांप्रमाणेच या प्रमुख मार्गावरील वाहतुकीची समस्या बिकट बनली आहे. दरम्यानच्या मार्गावरील काही रस्ते एकेरी (वन वे) आहेत. मात्र, नागरिकांकडून या नियमांचे पालन होत नसल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढच होत आहे. मुख्य रस्त्यावर दुभाजक नसल्याने या समस्येत भर पडत आहे. 

शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बिंदू चौक, अंबाबाई मंदिर, जुना राजवाडा, खासबाग कुस्ती मैदान या पर्यटन स्थळांबरोबर लक्ष्मीपुरी, शाहूपुरी अशा व्यापारी पेठांनी तसेच दाट लोकवस्तीने व्यापलेला भाग आहे.

जुना बाजार, मटण मार्केट, धान्य व्यापार, लुगडी ओळ, कोंडा ओळ, शिवाजी रोड, बकरी बाजार, कोंबडी बाजार आदींना जोडणारा हा परिसर आहे. यामुळे साहजिकच या परिसरात कायम गर्दी असते. विविध हॉटेल्स, बेकरी, सिनेमागृह यामुळे यात अधिकच भर पडते. 

या कारणामुळे बिंदू चौक ते दसरा चौक या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ पहायला मिळते. या वर्दळीला अनेक कारणांनी अडथळे निर्माण होतात. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारचे व्यावसायिक असल्याने तेथे खरेदीसाठी सतत गर्दी असते. 

तसेच या रस्त्यावर स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने लोक रस्त्यावरच वाहने पार्किंग करतात. दुकान गाळ्यातील व्यापार्‍यांशिवाय किरकोळ विक्रेते, फेरीवाले, भाजीविक्रेतेही रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटलेली असतात.