Fri, May 24, 2019 06:45होमपेज › Kolhapur › नद्यांचे पाणी शेतीसही अपायकारक

नद्यांचे पाणी शेतीसही अपायकारक

Published On: Jun 01 2018 2:04AM | Last Updated: May 31 2018 11:24PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापुरातील नद्यांचे पाणी पिण्यास नव्हे तर शेतीसही उपयुक्‍त नाही. यात शरीरास अपायकारक असणारे झिंक, सिसम व आर्सिनेकचे प्रमाण वीस ते साठ पटीने अधिक आहे. त्याचप्रमाणे भाजीपाल्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक औषध फवारणी अधिक होत असल्याने त्यामध्ये माणसांमधील प्रतिकार शक्‍ती कमी करणारे घटक असल्याची माहिती कर्नाटकातील रायचूर कृषी संशोधन विद्यापीठाचे संचालक शंकर गौडा यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

ते पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. यासंदर्भात वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी संपर्क साधून संशोधन करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आम्ही कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे नांदणी येथून, दूधगंगेचे दतवाड, कृष्णा नदीचे राजापूर व वारणा नदीचे कोथळी येथून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्याची तपासणी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत करण्यात आली. ही प्रयोगशाळा राष्ट्रीय मानांकन प्राप्‍त आहे. एखादे कृषी उत्पादन निर्यात करावयाचे असेल तर त्यासाठी त्याची गुणवत्ता या प्रयोगशाळेत तपासली जाते. तपासलेल्या आठ ठिकाणच्या पाण्याच्या नमुन्यांपैकी पाच नमुने अतिशय दूषित आढळले आहेत. हे पाणी पिण्यास अजिबात योग्य नाही. 

शिरोळ परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणचे भाजीपाल्याचे 300 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यात कोबीज, पालक, वांगी, ढबू मिरची आदींचा समावेश आहे. या फळभाज्या लवकर मोठ्या व्हाव्यात, यासाठी अधिक प्रमाणात औषधे वापरण्यात आली असल्याचे प्राथमिक संशोधनात आढळून आले आहे. यामध्ये आढळून आलेले घटक माणसांची प्रतिकार शक्‍ती कमी करणारे आहेत. मात्र, त्यामुळे कर्करोग होतोच असे सध्या तरी म्हणता येणार नाही. हे टाळण्यासाठी शेतकर्‍यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. ते काम शेतकरी संघटनेने करावे, असेही ते म्हणाले.

जि.प.चे माजी बांधकाम सभापती अनिल मादनाईक म्हणाले, लोकांच्या आरोग्याची काळजी शेतकर्‍यांनीही घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कर्नाटकातील रायचूर कृषी संशोधन विद्यापीठाकडून हे नमुने तापसून घेतले. यामध्ये अधिक संशोधन पुढील टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर संघटनेच्या वतीने विद्यापीठ सांगेल त्याप्रमाणे शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येईल.
यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान काटे, डॉ. भीमाप्पा, कर्करोग तज्ज्ञ डॉ. आशुतोष पाटील, पं.स. सदस्या सुरेश कांबळे, रमेश भोजकर आदी उपस्थित होते.