होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत पाच लाखांच्या खंडणीसाठी उद्योजिकेस धमकी

इचलकरंजीत पाच लाखांच्या खंडणीसाठी उद्योजिकेस धमकी

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 05 2018 12:42AMयड्राव : वार्ताहर

कारखाना चालवायचा असेल तर पाच लाख रुपये खंडणी दे, नाहीतर खून करून कारखाना पेटवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी इचलकरंजीतील गुंड शाम लाखे व त्याच्या साथीदारांविरोधात महिला उद्योजिका सौ. अश्‍विनी महेश ओझा (वय 39, रा. श्रीपादसिद्धी अपार्टमेंट, इचलकरंजी) यांनी रविवारी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी मुबारक महम्मद शेख (25) व पैगंबर काशीम मुजावर ऊर्फ पठाण (29, दोघे रा. लालनगर, इचलकरंजी) या दोघांना अटक केली. तर मुख्य सूत्रधार लाखे फरार आहे. 

दरम्यान, शनिवारी गुंड लाखेवर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी इचलकरंजीतील काही राजकीय व गुन्हेगारी मंडळींनी पोलिस व फिर्यादीवर प्रचंड दबाव आणला होता. त्यामुळे फिर्यादी भयभीत झाली होती. मात्र, रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला व फिर्यादीच्या सुरक्षेची हमी देऊन मध्यरात्री गुन्हा दाखल केला. यामुळे या गुंडांवर ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता  आहे. 

सौ. अश्‍विनी ओझा व भाऊ अभिजित यांचा खोतवाडीत स्काय क्लिनर्स नावाचा ड्रायक्लिनर्सचा चार महिन्यांपासून कारखाना सुरू आहे. 1 फेब्रुवारी रोजी रात्री 11.30 वाजता कारखान्यातील कामगार प्रकाश खर्डे, नारायण देसाई व सुनील बडवे जेवण करीत असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी कारखान्यात घुसून ‘आम्ही शाम लाखे यांची माणसे असून, आम्हाला त्यांनीच पाठवले आहे. कारखाना चालवायचा असेल तर पाच लाखांची खंडणी द्यावी लागेल; अन्यथा मालकासह तुझा खून करून कारखाना पेटवून देऊ,’ अशी धमकी दिली. यावेळी प्रकाश खर्डे यांना शिवीगाळ करण्यात आली. ही घटना खर्डे यांनी अश्‍विनी ओझा यांना सांगितली. 2 फेब्रुवारी रोजी ओझा दिवसभर कारखान्यात थांबल्या. मात्र, कोणीही आले नाही. रात्री 8 वाजता खर्डे यांनी पुन्हा तिघांकडून खंडणीची मागणी करीत शिवीगाळ झाल्याचे ओझा यांना सांगितले. ओझा यांनी कारखान्याकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत ते पसार झाले होते. शनिवारी ओझा यांनी पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दाखवले. त्यानंतर शहरातील काही नेतेमंडळींनी पोलिस ठाण्यात येऊन फिर्यादीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे ओझा यांची फिर्याद देण्याची मानसिकता ढासळली. मात्र, पोलिसांनी त्यांना धीर देत गुंडगिरी मोडून काढण्यासाठी गुन्हा दाखल केला.