Sat, May 30, 2020 05:16होमपेज › Kolhapur › स्कूल बस अपघातातील जखमी ऋषिकेशचा मृत्यू

स्कूल बस अपघातातील जखमी ऋषिकेशचा मृत्यू

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 11:18PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर-सांगली महामार्गावर चोकाक-माले फाटादरम्यान कंटेनर व स्कूल बसचा मंगळवारी अपघात झाला होता. यामध्ये तिघांचा मृत्यू, तर 26 विद्यार्थी जखमी झाले होते. याच बसमधील स्कूलचा शिपाई ऋषिकेश दयानंद कांबळे (वय 25, रा. मुडशिंगी, ता. करवीर) यांचा उपचार सुरू असताना  येथील खासगी रुग्णालयात शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. ऋषिकेशचे अवयवदान करण्याची कुटुंबीयांची इच्छा होती; पण प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने इच्छा असूनही अवयवदान करता आले नाही.

चोकाक-माले फाटा दरम्यान कोल्हापूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या कंटेनरने स्कूल बसला जोरदार धडक दिली होती. यामध्ये कंटेनरमधील सुरेश खोत, सचिन खिलारी  हे दोघे जागीच ठार झाले होते, तर स्कूल बसचा जखमी चालक जयसिंग चौगुले (रा. मुडशिंगी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अपघातात गंभीर जखमी झालेला स्कूलचा शिपाई ऋषिकेश कांबळे याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ऋषिकेशच्या डोक्याला जोरदार मार लागला होता.त्यामुळे त्याचा मेंदू मृत (ब्रेनडेड) पावला होता.गेली चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण प्रकृती प्रतिसाद देत नव्हती. मेंदू मृत्यू पावल्यामुळे ऋषिकेश बरा होणार नसल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. मेंदूचा मृत्यू झाला असला तरी ऋषिकेशचे अवयवदान करता येऊ शकते, अशी माहिती डॉक्टरांनी कुटुंबीयांना दिली.

ऋषिकेशची आई व वडिलांनी हृदय, किडन्या दान करण्याचा निर्णय घेतला; पण ऋषिकेशच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने अवयवदान करण्यात अडथळा आला. गुरुवारी डॉक्टरांच्या पथकाने अवयव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण यश आले नाही. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ऋषिकेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.त्यांच्या पश्‍चात आई, वडील आणि विवाहीत बहीण आहे.