Mon, Mar 25, 2019 17:55होमपेज › Kolhapur › कोरेगाव-भीमा प्रकरण : दोषींवर कठोर कारवाई

कोरेगाव-भीमा प्रकरण : दोषींवर कठोर कारवाई

Published On: Jan 05 2018 1:12AM | Last Updated: Jan 05 2018 12:55AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापुरात बुधवारी झालेल्या घटनेतील समाजकंटकांचा सीसीटीव्हीच्याआधारे शोध घेतला जाईल. ज्यांनी कायदा हातात घेतला, मग ते कोणत्याही पक्षाचे, संघटनेचे असोत, त्यांची गय करणार नाही, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिला. नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले असून, शासन या नुकसानीची भरपाई देईल, असेही त्यांनी सांगितले. हा प्रकार दु:खद, आश्‍चर्यकारक आणि अनपेक्षित, पूर्वनियोजित असल्याचे सांगत यामागील सूत्रधारांचा शोध घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात  आलेल्या बंदला कोल्हापुरात हिंसक वळण लागले. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी आज शहरातील महाद्वार रोड, गुजरी, शाहूपुरी आणि सिद्धार्थनगर येथे भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नागरिकांच्या भावना जाणून घेत, सर्वांनी शांतता पाळावी, असे आवाहनही त्यांनी केले. यानंतर शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत याप्रकरणी प्लॅन करणार्‍यांचाही शोध घेऊ, असे सांगत हिंमत असेल तर निवडणुकीत लढा; पण समाजात असा विद्वेष निर्माण करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

बंदच्या काळात झालेली दगडफेक, तोडफोड आदी घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राला गालबोट लागले आहे, असे सांगत पालकमंत्री पाटील म्हणाले, लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. लोकशाहीत बंद पुकारणे योग्य नसले, तरी चळवळीच्या दृष्टीने तो प्रघात म्हणून चुकीचा आहे, असेही म्हणता येणार नाही. बंद काळात शाळा, महाविद्यालये बंद असतात. व्यापारी दुपारपर्यंत व्यवहार बंद ठेवतात. मात्र, बुधवारी कोल्हापुरात काही समाजकंटकांनी हात धुवून घेतले. बंद असलेल्या दुकाने, हॉटेलवर दगडफेक केली. दारात लावलेल्या वाहनांची तोडफोड केली. हे सर्व चिंताजनक आणि दु:ख देणारे आहे.

राजर्षी शाहूंचा हा शांततेचा जिल्हा आहे. येथे कधी धार्मिक दंगली झाल्या नाहीत, जातीय दंगलीचा तर प्रश्‍नच नाही; पण आश्‍चर्य वाटावे आणि दु:ख होईल अशी जातीय तेढ निर्माण झाली. ती विसरून आता पुढे जावे लागेल, असे सांगत पाटील म्हणाले, बुधवारी ज्या घटना घडल्या, त्यातील सर्व दोषींवर कारवाई केली जाईल. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे समाजकंटकांचा शोध घेतला जाईल. त्या सर्वांवर खटले दाखल होतील, त्यांनी ज्या कृती केल्या आहेत, त्यानुसार त्यांच्यावर ती कलमे लावली जातील. त्यांनी जे नुकसान केले, त्यानुसार ती भरपाई त्यांच्याकडून वसूलही केली जाईल. तोडफोड करणार्‍यांत 13 ते 18 या वयोगटातील मुले होती, त्यांचे पोलिसांकडे रेकॉर्ड नाही. आता मात्र त्यांचे रेकॉर्ड तयार होईल, असेही पाटील यांनी सांगितले.

पोलिसांची प्रशंसा

अनपेक्षित व अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती पोलिसांनी अत्यंत संयमाने हाताळली. पुरेसे बळ नसताना, कारवाई करणे सोयीचे नव्हते, यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता होती. यामुळे पोलिसांनी शांत डोक्याने परिस्थिती हाताळली, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, आ. अमल महाडिक, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विजय जाधव आदी उपस्थित होते.

पूर्वनियोजित प्रकार असल्याचा आरोप

ही घटना अनपेक्षित होती; पण ती पूर्वनियोजित होती, असा आरोप करत पाटील म्हणाले, जे समाजकंटक तोडफोड करत होते, त्यांच्या हातात दगड कोणी दिले, कोणी काठ्या पुरवल्या, कोणी पेट्रोल आणून दिले, कोणी पैसे दिले, याचा शोध घेतला जाईल. राज्यातील शांतता बिघवडण्याचे काम करण्यासाठी या समाजकंटकांना प्रशिक्षण दिले होते, असाही आरोप करत, हिंमत असेल तर निवडणुकीत लढा, असा इशाराही पाटील यांनी दिला.