Sat, Apr 20, 2019 18:13होमपेज › Kolhapur › रिक्षा वाढल्या, प्रश्‍न ‘जैसे थे...’ 

रिक्षा वाढल्या, प्रश्‍न ‘जैसे थे...’ 

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 06 2018 11:28PMकोल्हापूर : शेखर दुग्गी

पूर्वी रिक्षा व्यवसायातून चांगली कमाई व्हायची. बँकेचा हप्ता जाऊन, स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायातून मिळायचा. यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना रिक्षाचा मोठा आधार होता. अनेक रिक्षा व्यावसायिकांनी पै-पै जमवून स्वत:ची घरे बांधली. मुला-मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांचे संसार उभे केले. काळानुरूप या व्यवसायात स्पर्धा वाढत गेली. रिक्षाला पर्याय म्हणून दुचारी-चारचाकी वाहनांची संख्या वाढली. तशा अडचणी आणि प्रश्‍नही वाढत गेले. बेकायदेशीर वाहतूक आणि शासनाचे कठोर निर्णय यामुळे आज रिक्षा व्यवसाय करणे कठीण बनले आहे.

पूर्वी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या मर्यादित होती. त्यामुळे रिक्षा व्यवसाय चांगला चालायचा. आज प्रत्येकाच्या घरी दोन ते तीन वाहने आहेत. याचा मोठा फटका रिक्षा व्यवसायाला बसला. कधी काळी दिवसाकाठी 400 ते 500 कमविणारा रिक्षाचालक आज फक्त 200 ते 300 रुपये मिळवितो. रिक्षांची संख्या वाढल्याने एका-एका स्टॉपवर जवळजवळ 10 ते 15 रिक्षांचा जागा दिसतात. एक भाडे मिळविण्यासाठी तासन्तास स्टॉपवर ताटकळत थांबावे लागते. 

शहर वाढले तसे बेकायदेशीर वाहतूकही वाढली. याचाही फटका या व्यवसायाला बसत आहे. शासनाच्या विविध अटीही रिक्षाचालकांना त्रासदायक ठरत आहे.  दरवर्षी 7 हजार 400 रुपये इतका इन्शुरन्स त्यांना भरावा लागतो. वर्षाकाठी रिक्षा पासिंगसाठी 15 ते 18 हजार खर्च येतो. तसेच 3850 इतका टॅक्स भरावा लागतो. घराचा हप्ता, मुलांचे शिक्षण यांचा खर्च भागवून घर चालविणे रिक्षा चालकांना अवघड झाले आहे. अनेक रिक्षाचालक कर्जबाजारी झाल्याचेही वास्तव आहे. शासनाने  रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी योजना सुरू करावी, इन्शुरन्सची रक्कम कमी करावा, अशी मागणी रिक्षाचालकांतून होत आहे. शासनाने सकारत्मक भूमिका  घेतली तरच हा व्यवसाय टिकेल आणि वाढेलही.