Wed, Jun 26, 2019 17:36होमपेज › Kolhapur › रिक्षाने दिला हजारोंना रोजगार

रिक्षाने दिला हजारोंना रोजगार

Published On: Aug 02 2018 1:58AM | Last Updated: Aug 02 2018 12:31AMतीन चाकी म्हटलं की, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येते ती रिक्षा. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत रिक्षा हे प्रवासाचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. इतकेच नव्हे, तर ती हजारो लोकांच्या उदरनिर्वाहाची सोय करणारी अन्‍नपूर्णा आहे. कोल्हापूर आणि रिक्षाचे नाते अतूट आहे. तब्बल पाच तपांचा म्हणजेच सुमारे 60 वर्षांचा इतिहास कोल्हापूरच्या रिक्षाला लाभला आहे. किंबहुना, या तीन चाकांवर  दोन-तीन पिढ्या विकसित झाल्या आहेत. कोल्हापूरच्या इतर अनेक वैशिष्ट्यांपैकी एक असणार्‍या रिक्षा व्यवसायावर टाकलेला हा प्रकाशझोत...

कोल्हापूर : शेखर दुग्गी

कोल्हापूर शहरातील विविध पेठांत मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबीय एकवटले आहेत. पारंपरिक शेती व्यवसायासह दूध आणि गूळ उत्पादनाचा जोडधंदा येथे एकेकाळी तेजीत होता. मात्र, काळाच्या ओघात शहराचा विस्तार वाढला. लोकवसाहतींमुळे शेतजमिनींवर इमारती उभ्या राहिल्या. यामुळे शेतमजुरीवर अवलंबून असणार्‍या लोकांना पर्यायी व्यवसाय शोधावे लागले. दरम्यान, जीवनमानाची गती वाढल्याने शहरात स्वयंचलित वाहनांची संख्या वाढत गेली.

पूर्वी शहरांमध्ये वाहतुकीची मदार टांग्यांवर होती. 14 टांगाचालकांनी एकत्र येऊन 1958 साली टांगा ऑटा रिक्षा औद्योगिक सहकारी सोसायटी स्थापन करून रिक्षा कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न केले. टांगा व्यवसाय करणारे बहुतांश लोक रिक्षा व्यवसायात उतरले. गंगावेस हा कोल्हापुरातील पहिला रिक्षा स्टॉप होता. युनियनतर्फे गरजूंना आर्थिक मदत करून रिक्षाचे प्रशिक्षण देण्यात आले. रिक्षाचालकांचे लायसेन्स, बॅच काढण्यात आले. 

कोल्हापूरच्या रस्त्यावर पहिली रिक्षा 1964 साली धावली. प्रारंभी कोल्हापुरात लॅबे्रडा कंपनीच्या केवळ 11 रिक्षा होत्या. दोन आसन क्षमता असलेली ही रिक्षा दिसायला खूपच देखणी होती. त्यावेळी या रिक्षाची किंमत 5 हजार रुपये इतकी होती.

1970 नंतर खर्‍या अर्थाने रिक्षा व्यवसाय बहरला. 1970-75 मध्ये तीन आसनी असणारी फ्रंट इंजिन रिक्षा कोल्हापुरात आली. त्यावेळी रिक्षांची संख्या सुमारे 400 च्या घरात होती. केवळ 80 पैसे इतके रिक्षा भाडे होते. या रिक्षांतून प्रवास करताना प्रवाशांना वेगळाच अनुभव मिळायचा. 1980 नंतर बजाजची रिअर इंजिन (मागील बाजूस इंजिन) रिक्षा आली. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण सकाळी शिक्षण घेत रात्री रिक्षा चालवायचे. रिक्षा चालवून शिक्षण घेणारे अनेक तरुण शासनाच्या विविध विभागांत विविध हुद्द्यांवर पोहोचले. 

ही रिक्षाच अनेक सुशिक्षित बेरोजगारांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली. अनेक सधन कुटुंबीयांनी दोन-चार रिक्षा खरेदी करून त्या भाडे पद्धतीने चालकांना उपलब्ध करून दिल्या. यामुळे रिक्षामालक आणि चालकांच्याही कुटुंबीयांना रिक्षाचा मोठा आधार निर्माण झाला. 

पूर्वी गंगावेस, एस.टी. स्टँड, शिवाजी पुतळा, मिरजकर तिकटी, पद्मा चौक अशा ठराविक ठिकाणीच रिक्षा स्टॉप होते. सकाळी 6 ते दुपारी 2, दुपारी 2 ते रात्री 10 आणि रात्री दहा ते सकाळी 7 अशा तीन पाळीत (शिफ्ट) रिक्षाचालक व्यवसाय करत होते. रात्री-अपरात्री या स्टॉपवर हमखास रिक्षा मिळायच्या. रिक्षाचालकांकडून मिळणारा विश्‍वास आणि प्रामाणिक सेवेमुळेच आजही प्रवासी रिक्षातून बिनधास्त प्रवास करतात.

दत्ता घाटगे सर्वांचे मिस्त्री

पूर्वी रिक्षा बंद पडली की, मोठी पंचायत व्हायची. त्यावेळी दत्ता घाटगे यांनी रिक्षा दुरुस्तीचे काम सुरू केले. तेच रिक्षा दुरुस्त करणारे एकमेव मिस्त्री होते. कोल्हापूरप्रमाणे सांगली येथेही रिक्षा दुरुस्तीसाठी दत्ता मिस्त्री जात. त्यांच्या हाताखाली पुढे शेकडो मिस्त्री तयार झाले.