Wed, Jun 26, 2019 23:41होमपेज › Kolhapur › रिक्षा बनली कुटुंबाची घटक

रिक्षा बनली कुटुंबाची घटक

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 03 2018 12:12AMकोल्हापूर : शेखर दुग्गी 

शहरातील विविध पेठा-पेठांमध्ये असणार्‍या सुशिक्षित बेरोजगारांना रिक्षा व्यवसायाचा मोठा आधार मिळाला आहे. शेती नसणार्‍या अनेक लोकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हे एक उदरनिर्वाहाचे साधन बनले. यामुळे रिक्षाला लोक जीवापाड जपू लागले. तिची सेवा करू लागले. यातूनच जन्म झाला, कोल्हापूरच्या आणखी एका वैशिष्ट्याचा म्हणजे रिक्षा सौंदर्य स्पर्धेचा. 

रिक्षाच्या देखभालीबरोबरच कालौघात यातून प्रवास करणार्‍या ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन आणि त्यांच्या मनोरंजनाच्या उद्देशाने रिक्षा सजावटीवर भर दिला जाऊ लागला. अंतर्गत सजावटीपासून ते प्रवाशांना लक्झरी सेवा देण्यासाठी कोल्हापूरचे रिक्षावाले पाण्यासारखा पैसा खर्च करतात. यामुळे कोल्हापूरच्या रिक्षा या राज्यातच नव्हे, तर परराज्यातही नावारुपाला आल्या. आपली रिक्षा प्रत्येकांच्या नजरेत भरावी, चारचौघांत उठून दिसावी, यासाठी येथील प्रत्येक रिक्षावाल्याची प्रामाणिक धडपड असते. प्रामाणिकपणे काम करणारा रिक्षाचालक रिक्षाच्या अंतर्गत आणि बाह्य सौंदर्यालाही तितकाच महत्त्व देतो. रिक्षाच्या किमतीपेक्षा तिच्या सौंदर्यावर लाखो रुपये खर्च करणारा हौशी रिक्षाचालक कोल्हापुरातच आहे. नव्या नवरीसारखी रिक्षा सजविण्याचे वेड रिक्षावाल्यांनी जपले आहे. म्हणून तर रिक्षा एक-दोन दिवस नव्हे, तर ती रोजच देखणी दिसावी, यासाठी तिची नेहमीच निगा राखली जाते. मध्यरात्री आणि भल्या पहाटे रिक्षाला शाम्पूने धुणे, फुलांनी सजविणे, गजर्‍याने मढविणे, रंगबिरंगी लाईट लावणे अशा प्रकारची सजावट केली जाते. रिक्षाप्रमाणे मायबाप प्रवाशांचीही तितकीच काळजी रिक्षाचालक घेतो. प्रवासी रिक्षात बसताना अत्तर मारणे आणि तितक्याच आपुलकीने कोठे जाणार, हे विचारतो. रिक्षात बसणार्‍या प्रत्येक प्रवाशाला  समाधान मिळावे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. येथील प्रत्येक रिक्षांची नावे देखील काहीशी हटके आहेत. त्या नावाने ती रिक्षा ओळखली जाते.

हायटेक रिक्षा...
प्रवाशांच्या मनोरंजनासाठी टिव्ही-स्क्रीन, वाचनासाठी वृत्तपत्रे-मासीके, चांगल्या प्रतिचे कुशन, पिण्याच्या पाण्याची सोय, वाय..य सुविधा, मोबाईलसाठी चार्जर, एसटी आणि रेल्वेचे वेळापत्रक, कोल्हापुरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती, महत्त्वाचे फोन नंबर, आग प्रतिबंधक यंत्रणा या सुविधा रिक्षांमध्ये मिळतात. 

पहिल्यांदा रिक्षात स्पिकर...
आज बहुतांश रिक्षांमध्ये म्युझिम सिस्टिम सर्रास बसविले जाते. कानठळ्या बसतील अशा मोठ्या आवाजात रिक्षात  सिस्टिम वाजत असते. ग्राहकांच्या मनोरंजनाच्या उद्देशाने रिक्षात स्पिकर लावण्याची सुरुवात कोल्हापूरात 1970 पासूनच आहे. त्यावेळी सदर बाजारातील ‘गामा-गुंगा’ या फ्रंट इंजिन रिक्षामध्ये स्पिकर बसविण्यात आला होता. ‘टेपची रिक्षा’ म्हणून ती सर्वत्र ओळखली जायची.

रिक्षा सुंदरी स्पर्धा...
महाराष्ट्र रिक्षा चालक सेना आणि  शिवाजी पेठेतील निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळ यांच्या पुढाकाराने प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला रिक्षा सुंदरी स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, निपाणी, बेळगाव, मालवण, रत्नागिरी, पंढरपूर, बार्शी येथून रिक्षा सहभागी होतात. विजेत्यांना रोख बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यासह पुणे, सांगली, सातारा आणि संकेश्‍वर येथेही स्पर्धा भरविल्या जात असल्याची माहिती संयोजक राजू जाधव यांनी दिली.