Fri, Jul 19, 2019 07:07होमपेज › Kolhapur › भोसलेवाडीत रिक्षाच्या धडकेत बालकाचा मृत्यू

भोसलेवाडीत रिक्षाच्या धडकेत बालकाचा मृत्यू

Published On: May 13 2018 2:15AM | Last Updated: May 13 2018 1:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

भरधाव रिक्षाने दिलेल्या धडकेत आयुष संदीप भाकरे (वय 5, गगनगिरी हौसिंग सोसायटी, भोसलेवाडी) या बालकाचा मृत्यू झाला. दुपारी घरासमोर खेळत असताना रिक्षाने (एमएच 08 ई 3395) त्याला दहा फुटांपर्यंत फरफटत नेल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. रिक्षाचालक पसार झाला असून, शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

आयुष त्याची बहीण श्रद्धा आणि इतर मुलांसह भोसलेवाडीतील प्राथमिक शाळेसमोर खेळत होता. भोसलेवाडीकडे जाणार्‍या भरधाव रिक्षाच्या पुढील चाकाखाली तो आला. रिक्षाने त्याला सुमारे दहा फुटांपर्यंत फरफटत नेले. गंभीर जखमी अवस्थेत रिक्षाचालक आणि नागरिकांनी

त्याला उपचारासाठी कदमवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. आयुषने तीन तासांपर्यंत मृत्यूशी झुंज दिली. अखेर ही झुंज अपयशी ठरली. आयुषचे वडील संदीप भाकरे टेम्पोचालक असून, घरची परिस्थिती बेताची आहे. अपघाताने भाकरे कुटुंबाला मोठा मानसिक धक्‍का बसला. आयुषच्या मृत्यूने भोसलेवाडी परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे.