Fri, Jul 19, 2019 00:54होमपेज › Kolhapur › चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 14 2018 1:11AM

बुकमार्क करा
पन्हाळा : प्रतिनिधी

विविध गुन्ह्यांत आरोपींकडून ताब्यात घेतलेला किमती मुद्देमाल पन्हाळा पोलिस निरीक्षक रवींद्र साळोखे यांनी पन्हाळा व शाहूवाडी उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक आर. आर. पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना परत  केला. हा कार्यक्रम शाहूवाडी पोलिस उपाधीक्षक कार्यालयात नुकताच पार पडला. पन्हाळा पोलिस निरीक्षक रवींद्र साळोखे यांनी हा किमती ऐवज व मुद्देमाल परत मिळवून देण्यासाठी  विशेष मोहीम राबवली. 

पन्हाळा पोलिस ठाण्याकडील  दाखल गुन्ह्यातील किमती मुद्देमाल परत देण्यात आलेल्या व्यक्‍तींनी चोरीस गेलेला, तसेच हरवलेला मुद्देमाल परत मिळाल्याबद्दल पन्हाळा पोलिस व पोलिस निरीक्षक रवींद्र साळोखे यांचे आभार मानले. मुद्देमाल मूळ मालकांना परत दिलेल्या व्यक्‍तींमध्ये गुन्ह्यानुसार खालील व्यक्‍तींचा समावेश आहे,   गु.र.न. 74/2012, 75/2012  मधील मुद्देमाल-सोन्याची चेन व मणीमंगळसूत्र सुनंदा पाटील (रा. यवलूज) यांना देण्यात आले, 2) गु.र.न. 125/2012 मधील मुद्देमाल -सोन्याचे मणी चिगाबाई माने (रा. आसुर्ले) यांना देण्यात आले, 3) गु.र.न. 34/2013 मधील मुद्देमाल- सोन्याची लगड गंगुबाई दादू जाधव (रा. यवलूज) यांना देण्यात आली, तर 4) गु.र.न. 104/206 मधील मुद्देमाल-रोख रक्‍कम 12,000 रुपये  संजय बापू निकम (भैरवनाथ विकास संस्था, यवलूज) यांना परत दिले गेले. वरील लोकांना एकूण चार गुन्ह्यांतील किमती मुद्देमाल, रोख रक्‍कम व सोने शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात देण्यात आला. या मोहिमेमध्ये पन्हाळा पोलिस ठाणे कारकून राजू नाईक, मोहन घाटगे, श्रीकृष्ण ठाणेकर व बाबा किटे यांनी परिश्रम घेतले.