Thu, Jul 18, 2019 00:25होमपेज › Kolhapur ›

खासगी पुरस्कार स्वीकारण्यास सहकारी संस्थांना निर्बंध

खासगी पुरस्कार स्वीकारण्यास सहकारी संस्थांना निर्बंध

Published On: Apr 05 2018 2:13AM | Last Updated: Apr 05 2018 12:33AMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

कोणत्याही खासगी संस्थांकडून पुरस्कार स्वीकारण्यावर सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना शासनाने निर्बंध घातले आहेत. शासनाशिवाय अन्य कोणत्याही खासगी संस्थेकडून पुरस्कार स्वीकारू नयेत, अशी सक्त सूचना केली आहे. यातूनही एखाद्या संस्थेने खासगी संस्थेकडून पुरस्कार स्वीकारण्याचा प्रकार केल्यास त्या संस्थेवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. या आदेशाने पुरस्काराच्या नावावर संस्थेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍यांना मोठी चपराक बसणार आहे. 

सहकारी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या सहकारी संस्थांना शासन दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे. यापूर्वी सहकारी बँका व दूध संघ, मोठ्या पणनच्या सहकारी संस्थांना सरकार पुरस्कार देत असे. आता या पुरस्कारामध्ये दूध संस्था, पणनच्या लहान संस्थांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत सहकारी संस्थेतील भ्रष्टाचार झाकण्यासाठी खासगी संस्थांकडून पुरस्काराचे अवडंब करत असल्याची बाब सहकार खात्याच्या निदर्शनास आली आहे. यामुळे सहकार खात्याने असे पुरस्कार स्वीकारबाबत धोरण जाहीर केले आहे. 

यासंदर्भात सहकार खात्याने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, खासगी संस्थांचे पुरस्कार यावर शासनाचे कोणतेही नियंत्रण नसते, तरीही अनेक सहकारी संस्थांना असे पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोठे स्वारस्य वाटत आहे. विशेषत: ज्या सहकारी संस्थांतील ठेवीदार, सभासद यांच्याकडून सहकार खाते यांच्याकडे तक्रारी दिल्या गेल्या आहेत, अशा संस्था असे पुरस्कार घेण्यावर आघाडीवर आहेत. इतकेच नव्हे तर  पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रायोजकत्वही सहकारातील संस्था स्वीकारतात. त्यासाठी संस्थेतून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. पण असे पुरस्कार घेऊन त्या सहकारी संस्था सभासद आणि ठेवीदार यांच्यात संभ्रम पसरवतात. सहकारी चळवळीची सद्यस्थिती विचारात घेता, यामध्ये खास करून नागरी सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी बँका यांची परिस्थिती पाहिली असता यातील अनेक संस्था आर्थिक अडचणीतून वाटचाल करत आहेत, तरीही भ्रष्टाचार लपविण्यासाठी जर कोणी खासगी संस्थांकडून पुरस्कार मिळविण्याचे कृत्य होत असेल तर त्याला लगाम घालण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी खासगी संस्थांकडून सहकारी संस्थांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी निर्बंध घातले आहेत. या निर्णयामुळे सहकारी संस्था सुरू करून आपले चराऊ कुरण निर्माण करणार्‍यांना चांगलाच चाप बसणार आहे. 

संस्थेतील भ्रष्टाचार होणार कमी
अनेक सहकारी संस्था अशा आहेत की दरवर्षी त्यांनाच काही खासगी संस्थांचे पुरस्कार जाहीर होतात. तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या संस्थेचे संचालक मंडळ आठ ते दहा दिवसांच्या दौर्‍यावर जाते. त्यासाठी संस्थेतील लाखो रुपयांची उधळण केली जाते. इतकेच नव्हे तर गावोगावी, असे पुरस्कार स्वीकारल्याचे फलकही लावले जातात; पण त्यातून सभासदांची फसवणूक होत असते, याकडे कोणाचेही लक्ष नव्हते, आता सहकार खात्यानेच त्याला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संस्थातील भ्रष्टाचार कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 

Tags :  Co operatives, receive private awards