Mon, Jan 21, 2019 19:11होमपेज › Kolhapur › सजावटीवर येणार मर्यादा!

सजावटीवर येणार मर्यादा!

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 12:57AMकोल्हापूर : प्रिया सरीकर

शासनाने प्लास्टिक आणि थर्माकोल बंदी केल्याने यावर्षी गणेशोत्सवात सजावटीवर मर्यादा येणार आहेत. सजावट कशी करायची, असा प्रश्‍न सर्वांनाच  होता; पण कारागिरांनी पर्याय उपलब्ध केला आहे.  फोम, फायबर, वूडन आणि कापडी मखर, मंदिरे  बाजारपेठेत दाखल झाली आहेत. परिणामी,  बाजारपेठेतून थर्माकोल हद्दपार झाला आहे. पण इको-फ्रेंडलीच्या नावे बाजारात आलेला फोमही थर्माकोलचाच एक प्रकार असल्याचे पर्यावरण अभ्यासकांचे मत आहे.

गेल्या अनेक वर्षांत सजावटीसाठी केवळ थर्माकोलच पर्याय आहे असा समज  होता; पण त्याचे दुष्परिणामही दिसू लागले. विघटन न होणार्‍या थर्माकोलमुळे पर्यावरण धोक्यात येत असल्याची बाब पुढे आल्यानंतर जनजागृती होत गेली. त्यात शासनाने बंदी घालून दंड आकारणी सुरू केल्यानंतर बाजारपेठेत प्लास्टिक आणि थार्मकोल दिसणे बंद झाले. गणेशोत्सवात घरगुती आरास करताना थर्माकोलचा अधिक वापर होत होता. बाजारात थर्माकोलची आकर्षक मखर आणि मंदिरेही मिळत होती. त्यामुळे साहजिकच घरोघरी बाप्पांसाठी आरास सजवताना थर्माकोल वापरला जात होता. यावर्षी उत्सवी बाजारपेठेतून थर्माकोल पूर्णपणे हद्दपार झाल्याचे चित्र आहे. याऐवजी फोमच्या कमानी, फोम शीटस्पासून बनवलेल्या मंदिरांनी बाजार व्यापला आहे.

कोट्यवधींची उलाढाल ठप्प
गणेशोत्सवात थर्माकोलचे मंदिर, मखर, कमानी, जाळी, खांब अशा एक ना अनेक वस्तू बाजारात दिसायच्या. केवळ गणेशोत्सवात कोल्हापुरात थार्माकोलची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती; पण यंदा ही उलाढाल ठप्प झाली आहे. याचा परिणाम लहान व्यावसायिकांवर झाला आहे. फायबर मंदिरे आणि मखर, प्लायवूडपासून बनवलेली मंदिरे, मखर, कमानी, नक्षीदार खांब आणि कापडी मंदिरे असा पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे; पण तो महाग असल्याने लहान व्यापार्‍यांकडून याला हवा तसा उठाव होत नसल्याचे मत सजावट साहित्याचे होलसेल व्यापारी जुबेर मोमीन यांनी व्यक्‍त केले आहे.

थर्माकोल हद्दपार फोम, फायबर, वूडन, कापडी मखरीचा पर्याय फोमही घातकच थर्माकोलवर बंदी आल्याने बाजारात फोमचा वापर करून सजावट साहित्य बनवले जात असले तरी तेही अपायकारक आहे. फोम हा इको-फ्रेंडली सजावटीसाठी पर्याय होऊ शकत नाही. कारण फोमही सिंथेटिक बेस मटेरियल आहे. थर्माकोलप्रमाणे याचे तुकडे रस्त्यावर साचू लागले तर पर्यावरणाला धोका पोहोचणार आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी व्यक्‍त केले.