Sun, May 26, 2019 18:40होमपेज › Kolhapur › विद्यार्थी आत्महत्या, महिला अत्याचार, छेडछाडीवर विद्यार्थ्यांचा उहापोह : यूथ पार्लमेंटला प्रतिसाद

कोण म्हणतं की सोळावं वर्ष धोक्याचं

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:44AM

बुकमार्क करा

कोल्हापूर: प्रतिनिधी 

‘कोण म्हणतं की सोळावं वर्ष धोक्याचं’ असा प्रश्‍न उपस्थित करून अहो, याच वयात संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यावर विजयी पताका फडकविली. मग तुम्हीच का व्यसनाधीन होता आणि सोशल मीडिया व आत्महत्येच्या चक्रव्युहात अडकता. ऊठा, जागे व्हा आणि करा आपल्या करिअरला सलाम, असा परखड सल्ला अजित पोर्लेकर या विद्यार्थ्याने दिला आणि यूथ पार्लमेंट वक्तृत्व स्पर्धांना उपस्थित तरुणाईने टाळ्यांच्या गजरात त्याला प्रतिसाद दिला. खरंच, आजची तरुणाई वाया गेलेली नाही, तर त्यांच्याकडे मोठी ऊर्मी आहे, हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिद्ध झाले.

जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित महाराष्ट्र पोलिस यूथ पार्लमेंटच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. समाजाला भेडसावणार्‍या समस्या आणि त्याबाबत पोलिस व युवकांची भूमिका यावर यानिमित्ताने विचारमंथन होत होते. महिलांवरील अत्याचार, अंमली पदार्थांचे व्यसन, बालगुन्हेगार, जातीयवाद, गर्भलिंग निदान, बालकांवरील अत्याचार, विद्यार्थ्यांमधील वाढते आत्महत्येचे प्रमाण, ब्लू व्हेल गेम अशा विषयांवर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपली परखड मते मांडली. केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये शनिवारी या स्पर्धा झाल्या. सामाजिक समस्या आणि त्याबाबत तरुणाईमध्ये असलेले भान याचेच दर्शन याठिकाणी दिसून आले. 

पोलिस दलाने एक स्तुत्य कार्यक्रम आयोजित केल्याच्या प्रतिक्रियाही यावेळी उमटल्या. एकत्र कुटुंब पद्धतीपासून दूर चाललेल्या समाजाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जगातील सर्वाधिक युवांचा देश, पण युवकांच्या आत्महत्या दररोज पाहतो आहे. तरुणाईसाठी मरण अत्यंत स्वस्त झालंय, नितीमूल्ये, संस्कार, खेळ यापासून चार हात लांब झालेल्या तरुणवर्गाला वेळीच प्रवाहात आणण्याची गरज आहे, अशा नानाविध कल्पना विद्यार्थ्यांनी मांडल्या. 

प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, विवेकानंद कॉलेज अव्वल

या स्पर्धेत शालेय गटात प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलने (वृषाली इंगळे, श्रावणी मुंगळे, प्रतीक्षा गवस) प्रथम क्रमांक पटकावला. ‘अंमली पदार्थांचे सेवन’ या विषयावर तिघींनी विचार मांडले. उपविजेतपद कोल्हापूर पब्लिक स्कूलने मिळवले. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. महाविद्यालयीन गटात विवेकानंद कॉलेज (सौरभ सर्जेराव पाटील, सौरभ संजय पाटील, सलोनी अर्जुन मेस्त्री) यांनी ‘गर्भलिंग निदान’वर मते व्यक्त केली. उपविजेतपद कमला कॉलेजने मिळवले. सहभागी राजाराम हायस्कूल, देशभूषण हायस्कूल, नेहरू ज्युनिअर कॉलेज, गोखले कॉलेज यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना विश्‍वास नांगरे- पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, संजय मोरे, संजय साळुंखे, अनिल गुजर, मिलिंद धोंड उपस्थित होते. परीक्षक म्हणून डॉ. रेश्मा पवार, आराधना श्रीवास्तव, शिल्पा देगावकर यांनी काम पाहिले. 

ब्लू व्हेल नको, मैदानी खेळ खेळा

ब्लू व्हेल गेमने जगभरात थैमान घातले असताना कशाला तो गेम खेळून स्वतःचा गेम करून घेता, असं सांगत प्रथमेश कुलकर्णी याने मैदानी खेळ खेळा, असे आवाहन केले. 

पालकांचीही जबाबदारी

‘आत्महत्या समस्येबाबत पालकांची जबाबदारी काय’ असा प्रश्‍न परीक्षकांनी विचारला असता आरती पाटीलने पालकांंबरोबरच मित्र परिवाराची जबाबदारीही मोठी असल्याचे सांगितले. एकत्र कुटुंब पद्धती आता पाहावयास मिळत नाही, ही चिंतेची बाब असून विद्यार्थी आपल्या मित्रांजवळ व्यक्त होतात; पण आपला पाल्य दिवसभरात काय करतो?, कोणासोबत असतो? याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही तिने सांगितले. 

यूथ पार्लमेंटची संकल्पना...

जे विषय अभ्यासक्रमात शिकवले जात नाहीत, ज्याबाबत विद्यार्थी चर्चा करू शकत नाहीत, अशा समस्यांबाबत विचारविनिमय व्हावा, यासाठी यूथ पार्लमेंटचे आयोजन करण्यात आल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे- पाटील यांनी स्पष्ट केले. एखाद्या समस्येची पार्श्‍वभूमी, प्रशासनाची भूमिका आणि युवकांची भूमिका या बाबत तीन विद्यार्थ्यांनी मते व्यक्त करावीत, अशी संकल्पना यामागे असल्याचेही त्यांनी सांगितले.