Sun, Aug 25, 2019 12:17होमपेज › Kolhapur › क्रांतीचे प्रतीक असणार्‍या कार्यकर्त्याचा सन्मान : डॉ. पवार(Video)

क्रांतीचे प्रतीक असणार्‍या कार्यकर्त्याचा सन्मान : डॉ. पवार (Video)

Published On: May 29 2018 1:38AM | Last Updated: May 29 2018 1:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गोरगरीब, शोषित समाजाच्या अन्यायाला आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडून  त्यांना न्याय देणारे क्रांतीचे प्रतीक म्हणजे डॉ. भारत पाटणकर  आहेत, असे गौरवोद्वार डॉ. जयसिंगराव पवार यांनी काढले. भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीने डॉ. भारत पाटणकर यांना भाई माधवराव बागल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी ते बोलत होते. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

डॉ. पवार म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाटणकर यांच्या पूर्वजांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिलेला आहे. एवढेच काय तर छत्रपती शिवराय यांच्या काळातही त्यांचे योगदान असल्याचे दाखले मिळतात. आज त्यांची चौथी पिढी समाजाच्या वंचित घटकांना न्याय देण्यासाठी डॉ. भारत पाटणकर यांच्या रूपाने  काम करत आहे. आजही धरणग्रस्त, पंढरपुरातील बडवे हटाव, दुष्काळ निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी लढा देत आहेत.  डॉ. पाटणकर यांनी या क्षेत्रात केलेले काम उत्तुंग आहे. त्याचे स्मरण ठेवून नव्या पिढीने त्यांच्या कार्याची प्रेरणा घेण्याची गरज आहे.  सत्काराला उत्तर देताना डॉ. भारत पाटणकर म्हणाले, चळवळ करताना अनेक पुरस्कार मिळाले; पण बागल पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. कारण या पुरस्कारातून समाज कार्याची प्रेरणा मिळते.  आजपर्यंत अनेक आंदोलने केली; पण यासाठी कोणत्याही स्वरूपाची देणगी स्वीकारली नाही.

जी आंदोलन झाली ती कष्टकरी समाजाच्या स्वयंस्फूर्तीने झाली. जनतेच्या सहभागातून उभा केलेले आंदोलन हे यशस्वी होते. ही सर्व आंदोलनेही शासनच्या धोरणाच्या विरोधात होती. सामान्य माणूस जेव्हा या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरला तेव्हा त्याला दिशा देण्याचे काम मी केले. यापुढेही समाजाहितासाठीचे लढे करतच राहू, असे सांगितले. यावेळी बागल विद्यापीठाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोकराव साळोखे यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविक टी.एस.पाटील यांनी केले. यावेळी चंद्रकांत यादव, संभाजीराव जगदाळे, रवी जाधव, गेल अ‍ॅम्वेट, व्यंकाप्पा भोसले व कार्यकर्ते उपस्थित होते.