Wed, Nov 21, 2018 03:35होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणाचा ठराव जिल्हा परिषद सभेत करा

मराठा आरक्षणाचा ठराव जिल्हा परिषद सभेत करा

Published On: May 10 2018 1:35AM | Last Updated: May 10 2018 12:59AMटोप : वार्ताहर

मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे अशा आशयाचा ठराव जिल्हा परिषदेच्या सभेत मंजूर करून घ्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांना हातकणंगले तालुका सकल मराठा समाजामार्फत देण्यात आले.

21 मे 2018 रोजी मराठा आरक्षण सर्वेक्षणअंतर्गत जनसुनावणीसाठी राज्य मागासवर्गीय आयोग कोल्हापूर दौर्‍यावर येत असून मराठा आरक्षणसंदर्भात निवेदने स्वीकारणार आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभांमधून मराठा आरक्षणाबाबत ठराव मंजूर करून देण्यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चामार्फत निवेदने दिली जात आहेत.

तसेच वैयक्‍तिक निवेदनेदेखील मागासवर्गीय आयोगाला सादर करण्यासाठी मराठा समाज बांधवांना प्रेरित केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून  सकल मराठा समाजामार्फत जि.प. अध्यक्षा सौ. महाडिक यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक हणमंत पाटील यांनी दिली. जास्तीत जास्त संख्येने मराठा समाजातील नागरिकांनी राज्य मागासवर्गीय आयोगास निवेदने द्यावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी धनाजी पोफले, दिग्विजय पोवार, विजय गायकवाड, दीपक कन्‍नुरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.