Wed, Jul 24, 2019 07:58होमपेज › Kolhapur › नियोजन समितीचा राहुल आवाडे देणार राजीनामा

नियोजन समितीचा राहुल आवाडे देणार राजीनामा

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 19 2018 1:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ताराराणी विकास आघाडीचे राहुल आवाडे यांचा जिल्हा नियोजन समिती सदस्यपदाचा राजीनामा देण्याचे आघाडीने ठरविले असल्याचे समजते. येत्या आठवडाभरात हा राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात येणार आहे. या ठिकाणी महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. शुभांगी शिंदे यांची निवड करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करत असताना भारतीय जनता पक्षाने शिवसेना, जनसुराज्य शक्‍ती पक्ष, ताराराणी विकास आघाडी, अपक्षा आदींची मोट बांधण्यात यश मिळविले. पण हे करत असताना त्यांना खूश करण्यासाठी भाजपला पदांचे वाटप करावे लागते. त्यामध्ये महिला व बालकल्याण समिती पद स्वाभिमानी शेतकरी संघटना व आवाडे गट यांच्या वाट्याला आले. त्यांनी हे पद सव्वा, सव्वा वर्ष वाटून घेण्याचे ठरविले. समिती सदस्यांची निवड करत असताना स्थायी समितीमध्ये जाण्यात राहुल आवाडे यांना रस होता. मात्र, या समितीमध्ये सुरुवातीला त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांनी चांगलाच दंगा घातल्याने नेत्यांना नमते घ्यावे लागले होते. दुसर्‍या एका सदस्याचे नाव वगळून आवाडे यांचे नाव त्या समितीत घालण्यात आले होते. या शिवाय जिल्हा नियोजन समितीमध्येही राहुल आवाडे सदस्य आहेत. सव्वा वर्ष झाल्यानंतर शुभांगी शिंदे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या सभापतिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांना या समितीतून बाहेर पडावे लागले. 

समितीतून बाहेर पडल्याने सौ. शिंदे यांना कोणतीच समिती राहिली नाही. सौ. शिंदे यांनी राजीनामा देताना आपणास कोणत्या तरी समितीचे सदस्य करावे, असे त्यांनी ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांकडे आग्रह धरला. ‘स्वाभिमानी’च्या नेत्यांनी तसे ताराराणी आघाडीच्या नेत्यांना सांंगितले. त्यांनी त्यांची मागणी मान्य केली. सौ. शिंदे यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला त्याच दिवशी राहुल आवाडे यानी आपल्या स्थायी समिती सभापती व जिल्हा नियोजन समिती सदस्यपदाचा राजीनामा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडे दिला. 

यापैकी जिल्हा नियोजन समितीमधून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे समजते. सध्या दूध दरावरून सुरू असलेल्या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व्यस्त आहेत. आंदोलन संपल्यानंतर आवाडे यांचा राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकडे देण्यात येणार आहे.