Fri, Mar 22, 2019 07:54होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात राखीव वन क्षेत्र वाढणार

जिल्ह्यात राखीव वन क्षेत्र वाढणार

Published On: Apr 06 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 1:37AMकोल्हापूर : अनिल देशमुख

जिल्ह्यातील आणखी 43 हजार 337 हेक्टर जमीन राखीव वनासाठी मिळणार आहे. याबाबतची अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आली. तीन तालुक्यांतील या जमिनीचा राखीव वन म्हणून यापुढे वापर केला जाणार असल्याने जैवविविधता वाढण्यास मदत होणार आहे. आज काढण्यात आलेल्या अधिसूचनेमुळे जिल्ह्यातील राखीव वनाचे क्षेत्र 77 हजार 388 हेक्टरपर्यंत गेले आहे.

जिल्ह्यात 1 लाख 39 हजार 210.60 हेक्टर इतके क्षेत्र वनाखाली आहे. यामध्ये संरक्षित, राखीव वनासह खासगी संपादित वनांच्या क्षेत्राचा समावेश आहे. राखीव वनासाठी जिल्ह्यातील एकूण 515 गावांतील 60 हजार 213 हेक्टर जमीन राखीव वनासाठी कलम 4 नुसार ठेवण्यात आली आहे. या जमिनीची कलम 20 नुसार राखीव वनासाठी वर्ग करण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे.
जिल्ह्यातील शाहूवाडी, आजरा व पन्हाळा या तीन तालुक्यांतील 43 हजार 337 हेक्टर जमीन कलम 20 नुसार राखीव वन म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील 24 हजार हेक्टर, पन्हाळा तालुक्यातील 9 हजार 685 हेक्टर, तर आजरा तालुक्यातील 9 हजार 931 हेक्टर जागेचा समावेश आहे. आजरा आणि पन्हाळा तालुक्याच्या जागेबाबतची अधिसूचना आज काढण्यात आली असून, शाहूवाडी तालुक्याची अधिसूचना काही दिवसांपूर्वी काढण्यात आली आहे.

जिल्ह्यात वन संरक्षण कायद्यातील कलम 20 नुसार राखीव वनाचे क्षेत्र 34 हजार 51 हेक्टर इतके होते, त्यात आता 43 हजार 337 हेक्टरची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील राखीव वनाचे क्षेत्र 77 हजार 386 हेक्टर इतके झाले आहे. अन्य तालुक्यांतील जमिनीची कलम 20 नुसार राखीव वनांतर्गत समावेश करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभूनाथ शुक्ला यांनी सांगितले. जिल्ह्यासाठी हा मोठा निर्णय असल्याचे सांगत राज्यात जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र राखीव वनासाठी असल्याचेही त्यांनी सांगितले.

वन संरक्षण कायद्याच्या कलम 20 नुसार राखीव वन क्षेत्र घोषित केल्यास त्या क्षेत्रात वनविभाग वगळता कोणाचेही कसलेही अधिकार राहत नाहीत. या क्षेत्रात केवळ वनाची निर्मिती आणि वाढ करता येते. जिल्ह्यात केवळ वनासाठी असलेल्या क्षेत्रात वाढ होणार असल्याने जैवविविधतेबरोबर वनसंपदा वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचेही सांगण्यात आले.

Tags : kolhapur district, forest