Tue, Mar 19, 2019 15:33होमपेज › Kolhapur › शालिनी स्टुडिओ जागेवरील आरक्षण कायम करा

शालिनी स्टुडिओ जागेवरील आरक्षण कायम करा

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 12:25AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

 शालिनी स्टुडिओ जागेवरील आरक्षण कायम ठेवावे, तसेच तेथील बांधकाम परवानगी रद्द करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी आरक्षणाच्या प्रस्तावाला विरोध करणार्‍या कारभारी नगरसेवकांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात  आल्या.

 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शालिनी स्टुडिओ आरक्षित भूखंडावर महापालिकेने आरक्षणाचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठेवला होता. पण या सभेत काही कारभारी नगरसेवकांनी हा प्रस्ताव नामंजूर करून कोल्हापूरच्या कलाप्रेमी जनतेवर अन्याय केला. ही जागा विकासकाला भ्रष्ट मार्गाने देण्याचा प्रयत्न  केला जात आहे. महापालिका आयुक्तांनी  सतर्कता दाखवल्याने ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे या जाग्यावर आहे तसे स्टुडिओ आरक्षण कायम ठेवावे. तसेच वादातीत असणार्‍या जागेवरील बांधकाम परवाने रद्द करावेत.

यावेळी आर.के. पोवार, निवासराव साळोखे, बाबा पार्टे, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, रणजित जाधव, सतिश बिडकर, शरद चव्हाण, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर,  नगरसेवक किरण नकाते आदी  उपस्थीत होते.