Sat, Jul 20, 2019 23:21होमपेज › Kolhapur › घटनादुरुस्ती करून आरक्षण द्यावे

घटनादुरुस्ती करून आरक्षण द्यावे

Published On: Jul 29 2018 1:22AM | Last Updated: Jul 29 2018 1:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनेतील एका कलमात दुरुस्ती करावी लागेल. राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार आहे. लोकसभेत भाजप सरकारचे बहुमत आहे. त्यामुळे लोकसभेत त्यांनी ही दुरुस्ती मंजूर करावी. राज्यसभेत त्यांचे संख्याबळ कमी आहे; पण राज्यसभेत ही दुरुस्ती मंजूर करून घेण्याची जबाबदारी मी घेतो. यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणीन, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खा. शरद पवार यांनी शनिवारी दसरा चौकातील सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या व्यासपीठावरून बोलताना दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून ऐतिहासिक दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजता खा. पवार हे आंदोलनस्थळी आले. तत्पूर्वी, त्यांनी राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला अभिवादन केले.

यावेळी खा. पवार म्हणाले, यापूर्वीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते; पण या निर्णयाविरोधात काही घटक न्यायालयात गेले. न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवला. आम्ही यातून मार्ग काढण्यासाठी देशातील उत्तमातील उत्तम वकिलांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, घटनेतील एका विशिष्ट कलमात बदल करण्याची भूमिका जर घेतली, तर यातून मार्ग निघेल. यासाठी  लोकसभा व राज्यसभेत आवश्यक बहुमत पाहिजे. महाराष्ट्रात ज्यांची सत्ता आहे, त्यांचीच केंद्रात सत्ता आहे. महाराष्ट्रातल्या सत्ताधार्‍यांना जर या प्रश्‍नाची आस्था असेल, तर त्यांनी त्यांच्या केंद्रातल्या आपल्या लोकांना सांगावे, घटनादुरुस्ती करून आणावी.   

मराठा मोर्चाने इतिहास निर्माण केला

मराठा समाजाने न्याय मागण्यांसाठी लाखोंचे 58 मूक मोर्चे शांततेत काढले. लाखोंचे मोर्चे काढूनही कुठे कुणाला धक्कासुद्धा लागला नाही. रस्त्यावरील कागदाचा तुकडासुद्धा मोर्चेकर्‍यांनी उचलून बाजूला ठेवला. या मोर्चाची दिल्लीत मोठी चर्चा झाली. जगाने याची दखल घेतली. असे आदर्श मोर्चे मराठा समाजाने काढून इतिहास निर्माण केला असल्याचे कौतुगोद्गार यावेळी खा. पवार यांनी काढले.
खा. धनंजय महाडिक, आ. हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, ए. वाय. पाटील, रामराजे कुपेकर,  नगरसेवक जयंत पाटील, आर. के. पोवार, राजू लाटकर, आदिल फरास, अनिल साळोखे आदींसह सकल मराठा आंदोलनात वसंत मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, जयेश कदम, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, उमेश पोवार, गणी फरास, कादर मलबारी, प्रकाश पाटील, राजू लिंग्रस, हर्षल सुर्वे, संगीता खाडे,  सरलाताई पाटील, दीपा पाटील आदींसह राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि नगरसेविका यावेळी उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री बदलले तर आम्हाला फायदाच

मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन पेटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला जात आहे. परिणामी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांनी, येत्या काळात निवडणुका आहेत. भाजपने मुख्यमंत्री बदलला, तर त्याचा आम्हाला फायदाच होईल, असे वक्तव्य करून फडणवीस हे चांगले काम करत असल्याचे अप्रत्यक्षपणे प्रमाणपत्र दिले. जनमानसात त्यांची प्रतिमा चांगली असल्याने त्यांना बदलणे भाजपसाठी धोक्याचे ठरू शकते, असेही पवारांनी सूचित केले. मुख्यमंत्री बदलाबाबत विनाकारण जातीय वाद निर्माण होऊ नये. मराठा आरक्षणासाठी फडणवीस यांच्यावर दबाव आणला जात आहे. झेपत नसेल तर पायऊतार व्हा, असे म्हणत विरोधी नेत्यांकडून फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. परिणामी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समर्थकांत अस्वस्थता पसरली होती. परंतु, आमदार रवी राणा यांच्यासह सहा अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री बदलले तर पाठिंबा काढू, असा इशारा दिला होता. आता पवार यांनी फडणवीस यांना सेफ झोनमध्ये नेऊन ठेवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.