Thu, Apr 18, 2019 16:03होमपेज › Kolhapur › सर्वांगीण प्रगतीसाठी आरक्षण हे माध्यम : राजेंद्र कोंढरे 

सर्वांगीण प्रगतीसाठी आरक्षण हे माध्यम : राजेंद्र कोंढरे 

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 12:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी

लोकशाही आहे तोपर्यंत आरक्षण, समांतर आरक्षण, पदोन्‍नती, बिंदू नामावली, महिला आरक्षण हे विषय राहणार आहेत; पण फक्‍त आरक्षणाने सर्वांगीण प्रगती होते असे नाही. तर आरक्षण हे त्यासाठीचे एक माध्यम आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी केले.

अखिल भारतीय मराठा महासंघाची मराठा प्रतिनिधी परिषद सोमवारी शाहू स्मारक भवनमध्ये झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून कोंढरे बोलत होते. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, रणजित जाधव, इंद्रजित सावंत आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहण्यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या अनुराधा पाटील, प्रदीप पाटील, ज्योती पाटील, शुभम शिरहट्टी, मोडी भाषेचे अभ्यासक वसंत सिंघम, अमित आडसुळे, राजेंद्र मोरे आदींचा सत्कार करण्यात आला.

कोंढरे म्हणाले, वेगवेगळ्या जातींना व घटकांना कायद्याने आरक्षण दिले जाते. काही राज्यांत आरक्षणाची टक्केवारी ही 72 टक्क्यांवर आहे. आता तर आर्थिक निकषावरही आरक्षण द्या, अशी मागणी होऊ लागली आहे; पण या गोष्टींचा व्यवहारी विचार करण्याची गरज आहे. कारण, दरवर्षी शिक्षण घेऊन 12 ते 14 लाख युवक बाहेर पडतात; पण सरकार 50 ते 60 हजारांपेक्षा जास्त लोकांना नोकर्‍या देऊ शकत नाही. याचा अर्थ सुशिक्षित बेकारांची संख्या खूप मोठी आहे. याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे. मोर्चातून मराठ्यांना आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा आदी मागण्या केल्या जात आहेत. यासंदर्भात सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. पुण्यामध्ये मागासवर्गीयांच्या विकासासाठी ‘बार्टी’ ही संस्था कार्यरत आहे, त्याप्रमाणे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा नेण्यासाठी ‘सारथी’ ही संस्था सुरू करण्यात आली आहे. या संस्थेचे कोल्हापुरात उपमुख्य केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा अध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा क्रांती मोर्चानंतर राज्यकर्त्यांकडून घोषणांचा पाऊस पडला. आता या घोषणांचा पाठपुरावा करण्यासाठी रस्त्यावर उतरून लढाई करावी लागेल, यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, कुणबी जातीच्या मराठा महासंघाकडे अनेक तज्ज्ञ आहेत, ज्यांना त्यांची मदत हवी आहे, ती दिली जाईल. यावेळी इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत, मोडी भाषेचे अभ्यासक वसंत सिंघम यांनी विचार मांडले.

युवकांनी उद्योजक बनावे

मराठा समाजाची लोकसंख्या मोठी आहे. युवकांनी उच्चशिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाच्या आधाराने व्यवसाय आणि उद्योग उभारावेत.  नोकर्‍या मागणार्‍यांपेक्षा नोकर्‍या देणारे बनले पाहिजे, असे राजेंद्र कोंढरे यांनी आवाहन केले.

राज्य मागासवर्गीय आयोगाला जास्तीत जास्त निवेदने द्यावीत

राज्य मागासवर्गीय आयोग 21 मे रोजी कोल्हापुरात येणार आहे. ते मराठा समाजातील विविध घटकांशी, लोकांशी बोलणार आहेत, यासाठी जिल्हा व शहरातील तरुण मंडळे, संस्थांनी आयोगाला निवेदन देऊन त्यांच्यासमोर म्हणणे मांडावे, असे आवाहन वसंतराव मुळीक यांनी केले. स्वागत एकनाथ जगदाळे यांनी केले. प्रास्ताविक शशिकांत पाटील यांनी केले. आभार सौ. शैलजा भोसले यांनी मानले.