Wed, Jul 15, 2020 23:54होमपेज › Kolhapur › संशोधन, अद्ययावत घडामोडी आता एका क्लिकवर!

संशोधन, अद्ययावत घडामोडी आता एका क्लिकवर!

Last Updated: Nov 18 2019 1:31AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

‘शिव-ज्ञानसागर : इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी’ व ‘इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टिम’ हे नावीण्यपूर्ण उपक्रम शिवाजी विद्यापीठाच्या वर्धापनदिनी सुरू होत आहेत. यामुळे विद्यापीठातील संशोधनासह येथील घडामोडींची ऐतिहासिक व अद्ययावत माहिती जगाच्या पाठीवरून कोठूनही एका क्लिकवर पाहता येणे शक्य होणार आहे. या दोन्ही प्रणालींचे उद्घाटन आज (सोमवार) होणार आहे.

शिव-ज्ञानसागर : इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी ऑफ शिवाजी युनिव्हर्सिटी

विद्यापीठाच्या सर्व अधिविभागांतील विषयतज्ज्ञ व संशोधक विद्यार्थी यांनी डिजिटल स्वरूपात निर्माण केलेल्या बौद्धिक संपदेचे संघटन, व्यवस्थापन, संप्रेषण व जतन करणे याला ‘इन्स्टिट्युशनल रिपॉझिटरी’ म्हणतात. रिपॉझिटरीमध्ये विविध कार्यक्रमांची छायाचित्रे, वार्षिक अहवाल, प्रकाशने, दीक्षान्त संबोधने, विविध परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका, अधिविभागातील संशोधकांचे शोधनिबंध व प्रकाशने आदी सर्व नवी-जुनी माहिती साठवून ठेवता येईल. ही माहिती विद्यापीठाच्या http://ir.unishivaji.ac.in:8080/jspui/ या लिंकवर पाहता येईल. 

विद्यापीठातील बौद्धिक संशोधनास जागतिक व्यासपीठ पुरविणे, एकाच मध्यवर्ती ठिकाणी सर्व कंटेंट डिजिटल स्वरूपात एकत्रित करणे, सर्व माहिती मुक्‍तपणे वापरास उपलब्ध करून देणे आदी उद्दिष्टे रिपॉझिटरीद्वारे साध्य होणार आहेत. विद्यापीठांतर्गत माहितीचा सामूहिक उपयोग, प्राध्यापक व संशोधकांच्या संशोधनाचे परीक्षण व मूल्यांकन त्यांच्या डिजिटल स्वरूपाच्या साहित्याच्या वापरावरून ठरविता येणार आहे. 

इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टिम (आय.आर.आय.एन.एस.)

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या गांधीनगर स्थित ‘इन्फ्लिबनेट’ सेंटरतर्फे नुकताच इंडियन रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टीम प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. शैक्षणिक, संशोधन संस्था यांच्यासाठी वेब आधारित संशोधन, माहिती व्यवस्थापन, सेवा असे याचे स्वरूप आहे. हा प्रकल्प http://unishivaji.irins.org या लिंकच्या स्वरूपात बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे विद्यापीठाच्या वेबसाईटवर सोमवारी लाँच करण्यात येणार आहे.

प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यापीठातील सुमारे 169 शिक्षकांची रिसर्च प्रोफाईल्स या माध्यमातून जगाला एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रालयाने ‘नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी’ अंतर्गत मान्यता दिली आहे. प्रणालीत विद्यापीठातील 32 अधिविभागांतील 167 शिक्षकांची 2613 प्रकाशित शोधनिबंध, पाच इतिवृत्ते, नऊ ग्रंथ, 2838 तज्ज्ञ स्रोत, 66378 सायटेशन्स व 210 अन्य संशोधकीय माहिती उपलब्ध असणार आहे. अशी दोन्ही उपक्रमांची माहिती बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांनी 
दिली. 

साधनस्रोत म्हणून वापर शक्य

भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्व शैक्षणिक व संशोधन संस्थांना सामायिक व्यासपीठ म्हणून याचा वापर करता येईल. तंत्र व्यक्‍ती, विभाग, शाळा, संस्थांचे ‘संशोधन केंद्र साधन’ म्हणून कामगिरी बजावेल. उपलब्ध तंत्रज्ञान, संशोधनांची क्षेत्रे, संशोधनातील अंतर ओळखणे व त्या अनुषंगाने संशोधन निधीवर त्यांचे धोरण परिभाषित करण्यासाठी धोरण निर्माते व सरकारचा महत्त्वाचा साधनस्रोत म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो.

रिसर्च इन्फॉर्मेशन नेटवर्क सिस्टिम व ‘शिव-ज्ञानसागर’ या दोन्ही उपक्रमांतील माहितीचा साठा हा संशोधकांसह प्रत्येक घटकासाठी उपयुक्‍त असून विद्यापीठातील संशोधनासह घडामोडींची ऐतिहासिक व अद्ययावत, विश्‍वासार्ह माहिती कोठूनही पाहता येणे शक्य होणार आहे. विद्यापीठातील बौद्धिक मालमत्तेचे व्यवस्थापन, साठवणूक, जपणूक व जगभरात तिचे वितरण करण्याकरिता ‘शिव-ज्ञानसागर’चा वापर उपयुक्‍त ठरणार आहे. 
- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू