Sat, Mar 23, 2019 00:34होमपेज › Kolhapur › शिवाजी पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरुस्ती करा

शिवाजी पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरुस्ती करा

Published On: Jan 31 2018 2:03AM | Last Updated: Jan 31 2018 1:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी पुलाच्या तुटलेल्या संरक्षक कठड्याचे  दुरुस्तीचे  काम तातडीने सुरू करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

 दि. 26 रोजी शिवाजी पुलावरून टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पुलाचा कठडा तुटून नदीत कोसळली. या दुर्घटनेत 13 व्यक्‍तींचा मृत्यू झाला. तीन जण जखमी झाले. या अपघातामध्ये शिवाजी पुलाच्या झालेल्या नुकसानीमुळे लोकांच्या व वाहनांच्या सुरक्षिततेच्या द‍ृष्टीने पुलाच्या कठड्याची दुरुस्ती तत्काळ करणे आवश्यक आहे. त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुलाचे क्षेत्र पुरातत्त्व खात्याच्या प्रतिबंधीत क्षेत्रात येत असल्याने आपत्कालीन व्यवस्थापनांतर्गत पुलाच्या संरक्षक कठड्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याबाबत परवानगी देण्याची विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
आज झालेल्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा करण्यात आली.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत कलम 34 (घ) मध्ये असलेल्या तात्पुरत्या पूल बांधणीच्या अथवा इतर आवश्यक संरचना तयार करण्याबाबत तरतुदीनुसार शिवाजी पुलाच्या संरक्षक कठड्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सुभेदार यांनी दिले.

बैठकीला महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने  उपस्थित होते.

कठड्याचे बांधकाम जुन्या रचनेप्रमाणे करा

अपघातात ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचा कठडा तुटला आहे. या तुटलेल्या कठड्याचे बांधकाम सिमेंटमध्ये न करता जुन्या रचनेप्रमाणे करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले. 

निवेदनात म्हटले आहे,  सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागातर्फे तुटलेला कठडा बांधण्यात येत आहे. मात्र, या ऐतिहासिक पुलाची रचना डिझाईन याचा विचार केलेला दिसत नाही. जुन्या पुलाचा लूक कायम राखण्यासाठी पुलाचा कठडा बांधताना जुन्या पद्धतीने घडीव दगडांपासून बनविणे आवश्यक आहे. शिष्टमंडळात मारोती भागोजी, अशोक देसाई, आर. डी. पाटील,  सुभाष रामुगडे  यांचा सहभाग होता.