Wed, Jul 17, 2019 18:12होमपेज › Kolhapur › भाडेकरार ऑनलाईन कोल्हापुरात सुविधा

भाडेकरार ऑनलाईन कोल्हापुरात सुविधा

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 1:57AMकोल्हापूर : प्रतिनिधी

भाडेकरारासाठी ऑनलाईन पद्धतीने ई-रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे. शासनाने कोल्हापुरात अधिकृत केंद्रास मान्यता दिली आहे. फक्त आधारकार्डच्या पुराव्यावर ही प्रक्रिया होणार आहे. यामुळे स्टॅम्पपेपर घेऊन तो रजिस्ट्रेशन करणे, या सर्व कटकटीपासून भाडेकरूंची सुटका होणार आहे. यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचार्‍यांना पुढील आठवड्यापासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा मुद्रांक अधिकारी डी. आर. पाटील यांनी दिली.     

घर भाड्याने द्यावयाचे म्हटले की, मालक आणि भाडेकरू यांच्यात समजुतीचा 100 रुपयांचा स्टॅम्पपेपर लिहून घेतला जातो; पण तो अधिकृत मानला जात नाही. त्यामुळे घर भाड्याने देत असताना स्टॅम्प रजिस्टर करणे, ही पद्धत कायदेशीर आहे. ही प्रक्रिया करत असताना घरमालक, भाडेकरू आणि ओळखीचे दोघे या सर्वांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन निबंधकांसमोर रीतसर सह्या कराव्या लागत होत्या. या सर्व प्रक्रियेसाठी 2 हजार ते 10 हजारांपर्यंत खर्च करावा लागत. तसेच दिवसभर वेळ द्यावा लागत असे. त्यामुळे शासनाने ई-रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत अवलंबली आहे.

राज्य शासनाकडून 2015 पासून मुंबई, पुणे या शहरात प्रायोगिक तत्त्वावर या प्रणालीचा अवलंब होत होता. पुणे, मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाल्याने नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये ही प्रणाली सुरू केली. तिथेही नागरिकांतून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात ही सुविधा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कोल्हापुरातही ई-रजिस्ट्रेशन सुविधा सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी एका खासगी व्यक्तीला केंद्र सुरू करण्यासाठी पुणे येथील नोंदणी उपमहानिरीक्षकांकडून अधिकृत मान्यता दिली आहे.

घर, गाळे, कार्यालय, गोदाम याची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यास सोपे जाणार आहे. ऑनलाईनद्वारे रजिस्ट्रेशन करतानाही ओळख व इतर सर्व बाबींची पूर्तता करावी लागणार आहे; पण संबंधित व्यक्तीच्या सवडीनुसार करू शकतो, यामुळे त्रास कमी होणार आहे.