Fri, Mar 22, 2019 22:44होमपेज › Kolhapur › ‘पुजारी हटाव’प्रश्‍नी सोमवारी बैठक

‘पुजारी हटाव’प्रश्‍नी सोमवारी बैठक

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 09 2018 1:19AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव प्रश्‍नी सोमवारी (दि.15) बैठक होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीचे संजय पवार यांनी ही माहिती दिली. या बैठकीत अंबाबाई मंदिर कायद्याबाबत राज्य शासनाची पुढील भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारनेही सरकारी पुजारी नेमण्याबाबत पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसाठी स्वतंत्र कायदा तयार केला आहे. हा कायदा हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी येणार होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव हा कायदा अधिवेशनात मांडता आला नाही. कायदा अधिवेशनात आणता आला नसला तरी अधिवेशन संपल्यानंतर  वटहुकूम काढला जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले होते.

पुजारी हटावबाबत अंबाबाई मंदिरासाठीच स्वतंत्र कायदा असावा, त्याबाबतचा वटहुकूम तातडीने काढावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समितीने दिला होता. या सर्व पार्श्‍वभूमीवर संघर्ष समितीचे सदस्य, माजी महापौर आर. के. पोवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज पालकमंत्री  पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पुजारी हटावप्रश्‍नी प्रसंगी तातडीने वटहुकूम काढून, अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमावेत, अशी सर्वसामान्यांची भावना आहे. आता अधिवेशन संपल्याने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती यावेळी पालकमंत्र्यांना करण्यात आली.

सकारात्मक प्रयत्न सुरू : पालकमंत्री

अंबाबाई मंदिरात सरकारी पुजारी नेमण्याबाबत संघर्ष समितीसमवेत बैठक घेतली जाईल. सोमवारी (दि.15) ही बैठक होईल. सरकारी पुजारी नेमण्याबाबत सरकार सकारात्मक असून, तसा कायदाही प्रस्तावित करण्यात आला आहे. तो अधिवेशनात मांडला आला नसला तरी वटहुकूम काढला जाणार आहे, त्याबाबतही सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. सोमवारी होणार्‍या या बैठकीत पगारी पुजारी प्रश्‍नी ठोस निर्णय अपेक्षित असल्याचेही यावेळी पवार यांनी सांगितले.