होमपेज › Kolhapur › कॉलेज कॅम्पसमधील टवाळखोरी मोडीत काढू

कॉलेज कॅम्पसमधील टवाळखोरी मोडीत काढू

Published On: Dec 17 2017 12:21AM | Last Updated: Dec 17 2017 12:21AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कॉलेज, हायस्कूल कॅम्पसमध्ये चालणारी टपोरींची गुंडागर्दी, हुल्लडबाजी मोडीत काढून समाजकंटकांवर कायद्याचा बडगा उगारण्यासाठी पोलिस प्रशासन, शैक्षणिक संस्थांमार्फत शहर व जिल्ह्यात संयुक्तपणे प्रभावी यंत्रणा उभारण्याचा निर्धार वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शनिवारी पोलिस मुख्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला.

शहर, जिल्ह्यातील कॉलेज, हायस्कूल कॅम्पसमध्ये होणारी गुंडागर्दी, हुल्लडबाजी व छेडछाडीला आळा घालण्यासाठी उपाययोजना राबविण्यासाठी पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापकांची पोलिस मुख्यालयात संयुक्त बैठक झाली. पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, डॉ. प्रशांत अमृतकर, सूरज गुरव, आर. आर. पाटील, ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते व चाळीसपेक्षा जास्त कॉलेजचे संस्थाचालक, प्राचार्य, 35 हायस्कूलचे मुख्याद्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

हुल्लडबाजी करणार्‍या टोळ्यांचा विद्यार्थ्यांना सतत त्रास होत असतो. गुंडागर्दी, छेडछाडीमुळे शैक्षणिक भवितव्याबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. समाजकंटकांविरुद्ध पाऊल उचलण्याचा प्रयत्न झाल्यास राजकीय हस्तक्षेप होतो. प्रसंगी दहशतीच्या घटनांना सामोरे जावे लागते. कॉलेज, हायस्कूलला पोलिस अधिकार्‍यांनी भेट दिल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. समाजकंटकांच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिस व शैक्षणिक संस्थांमार्फत संयुक्त यंत्रणा राबविण्याचाही पर्याय सुचविण्यात आला.

नांगरे-पाटील म्हणाले, शैक्षणिक कॅम्पसमधील वातावरण निर्भय व सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिस दलामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. महिला, युवतींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शैक्षणिक संस्थांना यापुढे पोलिसांची नियमित भेट होईल. त्याचे रेकॉर्ड केले जाईल, तक्रारपेटीतील सूचनांची दखल घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. दहशतीच्या बळावर हुल्लडबाजी करणार्‍यांची माहिती द्यावी, संबंधितांवर कारवाई केली जाईल. शांतता-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणार्‍यांची गय केली जाणार नाही. कठोर कायद्याचा बडगा उगारण्यात येईल, असे मोहिते यांनी स्पष्ट केले. चर्चेत प्रा. चंद्रकांत शिंदे, प्रा. संजय ओमासे, पी. एल. पाटील, युवराज आडके, आर. बी. कदम, डी. ए. कांबळे, जी. सी. पुजारी, राजेश बरग, व्ही. व्ही. शिंदे, प्रा. मुसळे आदी सहभागी झाले होते.

शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनाही धरले जाते वेठीस

दारूची दुकाने, लॉजेस, पानाच्या टपर्‍यांवर समाजकंटकांचा धिंगाणा असतो. दहशतीच्या बळावर कॉलेज मैदानांचा बेकायदा पार्किंगसाठी वापर केला जातो. विद्यार्थ्यांच्या अ‍ॅडमिशनसाठी तर अंगावर धावून जाण्याचेही प्रकार घडत असतात. काही संघटनांकडून शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही वेठीस धरून आर्थिक पिळवणुकीचे प्रयत्न होत असतात, असेही प्राचार्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले.