Thu, Apr 25, 2019 05:40होमपेज › Kolhapur › शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी झाले तंदुरुस्त!

शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी झाले तंदुरुस्त!

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 18 2018 11:36PMकोल्हापूर : विजय पाटील 

शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात पाणी शुद्धीकरण प्रकल्पामुळे (आर. ओ. प्लँट) विद्यार्थ्यांना पाण्यापासून होणार्‍या आजारांपासून मुक्‍ती मिळाली आहे. पाण्यामुळे होणार्‍या संसर्गामुळे वर्षाला सरासरी किमान दोनशे विद्यार्थी आजारी पडत होते. आता मात्र पाण्यामुळे एकही विद्यार्थी आजारी पडत नसल्याचे प्रशासनाच्या पाहणीवरून समोर आले आहे. यासह यंदापासून विद्यापीठ एक रुपयाचेही महापालिकेचे पाणी वापरणार नसल्याने वर्षाला बिलापोटी खर्च होणार्‍या 84 लाख रुपयांची बचत होणार आहे. 

शिवाजी विद्यापीठाचा परिसर आहे 853 एकर इतका विस्तीर्ण. हजारो विद्यार्थी,  प्राध्यापक तसेच अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने असल्याने पिण्याचे पाणी हा येथील प्राधान्यक्रमाचा विषय आहे. यासह उन्हाळ्यात झाडांना व हिरवळीलाही मुबलक पाणी लागते. स्वच्छतेसाठीही मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. मात्र, 1999 पासून विद्यापीठात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब साठवायचा आणि वापरायचा या संकल्पनेची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. यानंतर विद्यापीठात स्वयंस्फुर्तीने ‘पाऊस साठवा आणि पाणी जिरवा’ ही मोहीम सुरू झाली. यामध्ये सर्वांनी सकारात्मक सहभाग घेतला. मात्र, 2015 साली उन्हाळ्यात तलाव आटल्याने पाण्याची थोडी टंचाई जाणवली.

या टंचाईने ही मोहीम प्रशासनाने अधिक स्पष्ट आणि सुनियोजित केली. याचा परिणाम यानंतर पाणी साठे वाढले. कालौघात मुजलेल्या विहिरींचे पुनर्जीवन करण्यात आले. याचा परिणाम विद्यापीठ पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनत गेले. पण, तरीही महापालिकेच्या माध्यमातून पुरवले जाणारे पाणी उन्हाळ्यात लागत होते. दुसर्‍या बाजूला पाण्यामुळे कावीळ, पडसे, पोटांच्या तक्रारींनी काही विद्यार्थी आजारी पडत होते. पाणी मुबलक साठू लागल्यानंतर दीड वर्षापूर्वी प्रशासनाने आरओ प्लँट सुरू केला. या पाण्याची तज्ज्ञांनी तपासणी केली असता हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. याचा परिणाम परिसरात येणार्‍या प्रत्येकाला शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाले. आता बाहेरून किंवा घरातून बाटलीतून आणले जाणारे पाणी बिल्कूल बंद झाले आहे. या सगळ्यामध्ये पाण्यापासून आजारी पडणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण पूर्णपणे संपले असल्याचे प्रशासनाच्या पाहणीत दिसून आले.