Wed, Apr 24, 2019 07:37होमपेज › Kolhapur › डीएसकेंसह पत्नी, मुलाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

डीएसकेंसह पत्नी, मुलाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Published On: Jul 05 2018 1:38AM | Last Updated: Jul 05 2018 1:23AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक, डी.एस.के. ग्रुपचे मालक व कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीतील प्रमुख संशयित डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमांगी व मुलगा शिरीष यांनी अटकेची कारवाई टाळण्यासाठी दाखल केलेला जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.यू.कदम यांनी बुधवारी फेटाळला.

डीएसकेंसह पत्नी, मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने संशयितांवर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या कारवाईकडे कोल्हापूर जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील तीनशेवर गुंतवणूकदारांनी 20 कोटींपेक्षा अधिक रकमेची कंपनीत गुंतवणूक केली आहे. ठेवीची मुदत संपूनही व्याजासह ठेवीचा परतावा न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन कंपनीचे प्रमुख डी. एस. कुलकर्णींसह भागीदारांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत.

अटकेची कारवाई टाळण्यासाठी डीएसकेंसह तीनही भागीदारांनी येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले होते. त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.यू.कदम यांच्यासमोर सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्‍ल यांनी संशयितांनी दाखल केलेल्या अर्जावर हरकत घेतली. संशयितांनी कोल्हापूरसह राज्यातील शेकडो ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. फसवणुकीतील कोट्यवधीची रक्‍कम वसूल करणे महत्त्वाचे आहे. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास तपास यंत्रणेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारी व आरोपीच्या वकिलांच्या युक्‍तिवादानंतर न्यायाधीश कदम यांनी  अर्ज फेटाळून लावला.