होमपेज › Kolhapur ›

‘हल्लाबोल’मधून ढासळलेल्या बुरुजांची डागडुजी!

‘हल्लाबोल’मधून ढासळलेल्या बुरुजांची डागडुजी!

Published On: Apr 05 2018 2:13AM | Last Updated: Apr 05 2018 2:13AMकोल्हापूर : रणधीर पाटील

राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेतेमंडळींनी हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ल्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न केला. आता बालेकिल्ल्याची खरंच डागडुजी झाली की, केवळ वरवरून रंगरंगोटी झाली, हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतरच समजणार आहे. तरीही हल्लाबोल यात्रेमुळे पराभूत मानसिकतेत अडकलेले कार्यकर्ते मात्र रिचार्ज झाले आहेत. कुंपणावरील नेत्यांचा सस्पेन्स मात्र कायम आहे. 

बालेकिल्ल्याचे ढासळले बुरूज 
राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र व राज्य सरकारविरोधात राज्यभर हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन केले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील आंदोलनाचा प्रारंभ आ. हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघातून करण्यात आला. कागल ते मुरगूड दुचाकी रॅली आणि मुरगूडमध्ये जाहीर सभा घेत हल्लाबोल यात्रेचा नारळ फोडला. आ. मुश्रीफ यांनीही हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. कोल्हापूर जिल्हा कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. आताही राष्ट्रवादीचे नेते कोल्हापूरला बालेकिल्लाच समजतात; पण या बालेकिल्ल्याचे गेल्या दहा वर्षांत एक-एक बुरूज ढासळले आहेत. सध्या एखाद-दुसरा नेता सोडला, तर बालेकिल्ला पुरता भुईसपाट झाल्याचे वास्तव आहे. कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादीची निर्विवाद एकहाती सत्ता नाही. जिथे सत्ता आहे, तिथे काँग्रेस किंवा अन्य मित्रपक्ष सोबत आहेत. 

लोकसभेसाठी उमेदवार शोधावा लागतोय
आ. हसन मुश्रीफ आणि खा. धनंजय महाडिक यांच्यातून विस्तवही जात नाही. मुश्रीफ-महाडिक यांचे राजकीय ट्यूनिंग जमत नसल्याने राष्ट्रवादीच्या हातून अनेक सत्तास्थाने निसटून जात आहेत. त्यातून महाडिक यांची भाजपशी सलगी वाढून त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय फायदा भाजप उठवत आहे. मुश्रीफ-महाडिक यांच्यातील शीतयुद्ध आता इतके टोकाला गेले आहे की, वेळप्रसंगी मलाच लोकसभेच्या मैदानात उतरावे लागेल, अशी निर्वाणीची भाषा मुश्रीफ यांना करावी लागत आहे. यातूनच आता राष्ट्रवादीकडे मुश्रीफ यांच्याशिवाय तगडा उमेदवारच नसल्याचे पाहायला मिळत आहे.

एकेकाळी याच राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील इचलकरंजी (आताचा हातकणंगले) आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होते. जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थाने राष्ट्रवादीकडे होती; पण याच राष्ट्रवादीकडे 2014 मध्ये खा. राजू शेट्टी यांच्याविरोधात हातकणंगेल लोकसभा मतदारसंघातून लढायला तगडा उमेदवार नसल्याने मतदारसंघ काँग्रेसला देण्याची नामुष्की आली होती. आताही हातकणंगले मतदारसंघात हीच परिस्थिती आहे. माजी खासदार निवेदिता माने या लढण्यास इच्छुक असल्या, तरी गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादीची ताकद क्षीण झाली आहे. माने यांचाही मतदारसंघातील संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत त्यांचा खा. शेट्टी यांच्यापुढे निभाव लागणे कठीण आहे. त्यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत युवक क्रांती आघाडी स्थापन करून भाजपशी युती केली होती. मात्र, तरीही त्यांना रूकडी हा घरचा जिल्हा परिषद मतदारसंघही राखता आला नाही. अशा स्थितीत माने यांचा तिकिटासाठी विचार होणे अवघड आहे. 

कुंपणावरील नेत्यांचे काय?
राष्ट्रवादीमधील काही नेते भाजपशी सलगी करून आहेत. त्यांचे राष्ट्रवादीपेक्षा भाजपमध्येच जास्त मित्र आहेत. यातील काही नेते विधानसभेसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीला काही आजी-माजी आमदारही ऐन निवडणुकीच्या तोंडावर तोंडघशी पाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच हे नेते भाजपमध्ये उडी मारण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला ‘असे’ नेते माहीत नाहीत, असे म्हणणेही धाडसाचे होईल. अशा कुंपणावरील नेत्यांसाठी राष्ट्रवादी काय पर्याय निवडणार? हाही प्रश्‍न आहेच. नाहीतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांची शोधाशोध करावी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

राष्ट्रवादी खरंच विरोधी पक्षात! 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे सत्ताधार्‍यांवर तुटून पडले. त्यामुळे राष्ट्रवादी खरोखरच विरोधी पक्षात आहे, याची कार्यकर्त्यांनाही जाणीव झाली. नाहीतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याबरोबरचे सख्य, विधानसभा निकालानंतर न मागता दिलेला ‘विनाअट’ पाठिंबा, बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमांना मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अरुण जेटली आदी भाजपमधील दिग्गजांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादी भाजपचा मित्रपक्ष असल्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातून पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली होती. हल्लाबोलच्या माध्यमातून राष्ट्रवादीने भाजपविरोधात रान उठवल्याने कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. 
 

Tags :  ncp halabol yatra,  Western Maharashtra