Tue, Jul 16, 2019 11:52होमपेज › Kolhapur › समाज कल्याणच्या ट्रॅक्टर ‘पळवापळवी’ला ब्रेक!

समाज कल्याणच्या ट्रॅक्टर ‘पळवापळवी’ला ब्रेक!

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 12:08AMकोल्हापूर ः राजन वर्धन

मागासवर्गीय समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी  महत्त्वपूर्ण ठरलेल्या मिनी ट्रॅक्टर योजनेत पहिल्याच वर्षी झालेल्या मोठ्या ‘आर्थिक’ उलाढालीने या योजनेचा लाभ खर्‍या लाभार्थ्यांना मिळालाच नाही. अनेकांनी  यंत्रणेला हाताशी धरून लाभ पदरात पाडून घेतला तर काही खरेखुरे लाभार्थी दलालांच्या तावडीत सापडल्याने त्यांना आर्थिक झळ सोसावी लागली. योजनेतील सावळागोंधळ लक्षात घेऊन यंदा शासनाच्या समाजकल्याण विभागाने कडक नियमांचे बंधन घातले. त्यामुळे ट्रॅक्टर लुटारूंना बे्रक लागला असून दलालांचेही धाबे दणाणले आहेत.  

लाभार्थ्यांसाठी ड्रॉ पद्धती सुरू केल्याने दलालांची साखळीही मोडीत निघाली. मात्र, ज्यांनी दलालांकडे  ट्रॅक्टरसाठी पैसे गुंतविले त्यांची रक्कम बुडण्याचीही शक्यता आहे. यावर्षीच्या आतापर्यंतच्या 58 लाभार्थ्यांपैकी एकानेही कागद पत्रांअभावी दुसर्‍या हप्त्याची मागणी केली नसल्याने तो निधी तसाच पडून आहे.  

राज्य शासनाने समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील पुरुष बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरची योजना  गतवर्षीपासून सुरू केली आहे. प्रत्येक लाभार्थ्यांमागे 3 लाख 15 हजार असे 100 टक्के अनुदान दिले जाते. गतवर्षी सुमारे 51 लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टर दिले, पण लाभार्थी निवडीत ‘गडबड’ झाल्याने समाजकल्याण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांची वरिष्ठ पातळीवर झाडाझडती घेण्यात आली.   

यंदाच्या यादीत नाव ‘बसवून’ ट्रॅक्टर मिळवून देण्यासाठी दलालांनी प्रती लाभार्थी सुमारे 50 ते 60 हजारांपर्यंत रक्कम गोळा केली;  पण तत्कालीन अधिकार्‍यांची बदली झाली अन् त्यांच्याशी झालेले ‘व्यवहार’ही  गेले. नव्या अधिकार्‍यांनी यंदा लाभार्थी निवडताना ड्रॉ पद्धतीचा अवलंब करीत 65 लाभार्थी निश्‍चित केले.  शासनाने  यंदा  नवीन नियमही समाजकल्याण विभागाला घालून दिले आहेत. त्यानुसार दुसर्‍या हप्त्यासाठी खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचे आरटीओ पासिंगची नोंद कार्यालयात द्यावी लागते, पण आतापर्यंत 1 लाख 57 हजार 500 रु. चा लाभ दिलेले सुमारे 58 लाभार्थी दुसर्‍या हप्त्यासाठी अजून फिरकलेच नाहीत. 

लाभार्थी निश्‍चित करताना मागील वेळी झालेला गोंधळ लक्षात घेऊन यंदा ड्रॉ पद्धतीने 65 लाभार्थी पोलिस बंदोबस्तात निवडण्यात आलेले आहेत. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यात आली आहे. 7 लाभार्थ्यांनी पहिला हप्ता उचललेला नाही.  58 लाभार्थ्यांनी दुसर्‍या हप्त्याची मागणी केलेली नाही. एका महिन्याच्या आत त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर शासन आदेशानुसार चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल.  - बाळासाहेब कामत, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, कोल्हापूर.