Thu, Apr 25, 2019 18:49होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्‍तीसंबंधी विधेयक सादर 

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नियुक्‍तीसंबंधी विधेयक सादर 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : चंद्रशेखर माताडे

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचे विधेयक मंगळवारी विधानसभेत सादर करण्यात आले. या विधेयकावर बुधवारी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चर्चा होणार आहे. विधेयकाच्या मंजुरीनंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराप्रमाणे अंबाबाई मंदिरातही पगारी पुजारी नेमण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचबरोबर मंदिरात जमा होणारा सर्व पैसा व दागदागिने हे देवस्थानच्या तिजोरीत जमा होणार असून, त्यासाठी जिल्हास्तरीय समिती नेमण्याची व श्रीपूजक व त्यांच्या व्यक्‍तींचे परंपरागत व आनुवंशिक हक्‍क नाहीसे करण्याची शिफारसही विधेयकात सुचविण्यात आली आहे.

मंगळवारच्या विधानसभा कामकाजपत्रिकेत पाच शासकीय विधेयके दाखविण्यात आली होती. मात्र, ही विधेयके सादर करताना  संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी श्री करवीरनिवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर (कोल्हापूर) 2018 हे विधेयक सादर केले. कार्यक्रमपत्रिकेत नसलेले हे विधेयक येताच त्याबाबत सदस्यांनी विचारणा केली. तेव्हा बापट यांनी कामकाज क्रमाचे शुद्धीपत्र सदस्यांना देण्यात आल्याचे सांगितले.

या विधेयकात पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

श्रीपूजकांचे आनुवंशिक हक्‍क नष्ट करण्याची शिफारस

अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापन हे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून केले जाते. या समितीच्या अधिपत्याखाली 3 हजार 67 देवस्थाने आहेत. अंबाबाई मंदिर हे प्राचीन असून, तेथे दर्शनासाठी संपूर्ण देशातून लाखो भाविक येतात. या मंदिराचे व मालमत्तेचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यासाठी विशेष कायदा करण्यात यावा, असे सरकारला वाटते. त्याचबरोबर श्रीपूजकांचे आनुवंशिक हक्‍क नाहीसे करणे व देवस्थान व्यवस्थापन समितीयांच्या अधिकार क्षेत्रातील या मंदिराचे प्रशासन करण्यासाठी जिल्हा समिती स्थापन करण्याची तरतूद सुचविण्यात आली आहे. देवीची दररोजची पूजा, प्रासंगिक पूजा करण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात येणार्‍या जिल्हा समितीकडून पगारी पुजारी नेमण्याचे विधेयकात सुचविण्यात आले आहे. त्याचबरोबर श्रीपूजकांचे आनुवंशिक हक्‍क नष्ट करण्याच्या द‍ृष्टीने कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून त्याबाबतची भरपाई निर्धारित करण्याची तरतूद विधेयकात सुचविण्यात आली आहे.अर्पण वस्तू ही पुजार्‍यांची नव्हे,तर देवीची मालमत्ता
मंदिरात देवस्थान समितीने दानपेट्या ठेवल्या असून, त्यातून जमणारा निधी हा मंदिर व्यवस्थापन व धार्मिक कार्यासाठी केला जातो.

देवीचे धार्मिक कार्यक्रम हे श्रीपूजक या नावाने ओळखल्या जाणार्‍या पुजार्‍यांकडून सध्या पार पाडले जातात. देवीसमोरील पितळी उंबरठ्यावरील पैसे, मौल्यवान वस्तू, धातू व खडे, वस्त्रे या स्वरूपात भाविकांकडून देवीला वस्तू अर्पण केल्या जातात. भाविकांकडून दिल्या जाणार्‍या या सर्व अर्पण वस्तू या श्रीपूजक घेतात. भक्‍तांकडून देवीला अर्पण होणार्‍या वस्तू ही देवीची मालमत्ता आहे; हे सर्वमान्य झाले आहे. मंदिरात, मंदिराच्या आवारात वा पितळी उंबरठ्यावर भक्‍तांकडून देण्यात आलेली अर्पण वस्तू ही देवीची मालमत्ता असल्यामुळे त्याचा उपयोग हा मंदिराच्या व्यवस्थापनासाठी केला गेला पाहिजे. त्याचबरोबर देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी, मंदिरातील धार्मिक कार्यक्रम व उत्सव पार पाडण्यासाठी  करण्यात आला पाहिजे, असेही विधेयकात म्हटले आहे.

पुजार्‍यांना हटविण्याची भाविकांची मागणी

भक्‍तांनी देवीला दिलेल्या अर्पण वस्तूंसंदर्भात अनेक दावे, प्रतिदावे यांच्या पार्श्‍वभूमीवर देवीची नित्य पूजा व प्रासंगिक पूजा पार पाडणारे श्रीपूजक किंवा त्यांच्या व्यक्‍ती यांचे परंपरागत व आनुवंशिक हक्‍क नाहीसे करण्यासाठी भाविक, तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशांकडून सातत्याने मागणी केली जात आहे. राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही याबाबतचा प्रश्‍न आला होता. त्यावेळी सरकारने मंदिराच्या अधिक चांगल्या प्रशासनासाठी एक कायदा लवकरच आणण्याचे आश्‍वासन दिले होते.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला

त्यानुसार पंढरपूर मंदिर अधिनियमातील बाळकृष्ण पंढरीनाथ बडवे आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने 13 नोव्हेंबर 2006 रोजी निर्णय दिला आहे. देवतेला अर्पण केलेल्या वस्तू या देवतेच्या मालमत्ता आहेत. ती पुजारीवर्गाची मालमत्ता असू शकत नाही, असे या निर्णयात म्हटले आहे. या प्रकरणात न्यायालयाने नाथद्वारा मंदिर, तसेच काशी विश्‍वनाथ मंदिर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिले आहेत त्याचाही आधार घेतला होता. 

सरकारचे अधिकार;विधी आयोगाचे मत

राज्य विधी आयोगाने आपल्या 15 व्या अहवालात राज्य सरकारला इतर गोष्टींबरोबरच सेवेकरीवर्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्यक्‍तींचे आनुवंशिक हक्‍क नाहीसे करण्याची तरतूद करण्याकरिता कायदा करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार हे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Regarding, appointment,  Pagari priest,  Ambabai temple Kolhapur


  •