Wed, Apr 24, 2019 00:26होमपेज › Kolhapur › राज्यात लवकरच होणार केंद्रप्रमुखांची भरती 

राज्यात लवकरच होणार केंद्रप्रमुखांची भरती 

Published On: Mar 04 2018 1:43AM | Last Updated: Mar 03 2018 11:17PMकागल : बा. ल. वंदूरकर

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि साक्षरता या अभियानासंबंधी गठित केलेल्या कार्यबल गटाच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकविणे व शैक्षणिक दर्जा उंचावण्याकरिता एकूण 4 हजार 860 केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयान्वये केंद्रीय प्राथमिक शाळेकरिता प्रशिक्षित पदवीधर केंद्र प्रमुखाचे प्रत्येकी एक पद निर्माण करण्यात आले आहे. तसेच विशेष वेतनश्रेणी ही मंजूर करण्यात आली आहे. ही पदे जिल्हा परिषदेच्या 10 प्राथमिक शाळांकरिता एक या प्रमाणात निश्‍चित करण्यात आलेली आहेत. आता नवीन आदेशानुसार केंद्रप्रमुखांची 40 टक्के पदे सरळसेवेने आणि 30 टक्के पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेने भरली जाणार आहेत. तर उर्वरित 30 टक्के पदोन्नतीने भरली जाणार आहेत. 

शिक्षकांच्या वेतनश्रेणीतील पदे सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या निकषांनुसार प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या संवर्गातील त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार 100 टक्के पदोन्नतीने भरण्यात येत होती. केंद्रप्रमुख पदाची सेवा प्रवेश नियमावली ग्रामविकास विभागाने दि. 10 जून 2014 रोजी अधिसूचीत केली. त्यामुळे सरळसेवा विभागीय मर्यादित परीक्षा व पदोन्नतीने नियुक्तीकरिता विहित केलेले प्रमाण 40.30.30 अधिसूचनेच्या दिनांकापासून लागू झाले. केंद्रप्रमुख पदाचे सेवाप्रवेश नियम अधिसूचित होईपर्यंत दि. 2 फेबु्रवारी 2010 ते दि. 10 जून 2014 या कालावधीत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजाणी होण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि साक्षरता अभियानसंदर्भात शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, शिक्षणाचा दर्जा उंचावणे त्याच बरोबर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अभावितपणे भरण्यात आलेली केंद्रप्रमुखाची पदे नियमित करण्याबाबत तसेच केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवा, विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.

केंद्रप्रमुख पदभरती संदर्भात यापूर्वी पारित करण्यात आलेल्या 2 फेबु्रवारी 2010 चा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आला असून दि. 2 फेबु्रवारी 2010 ते दि. 10 जून 2014 या कालावधीत अभावितपणे नियुक्त केंद्रप्रमुखांची नियुक्ती 100 टक्के पदोन्नतीमध्ये मोडत असल्याने या शिक्षकांच्या सेवा केंद्रप्रमुख पदावर नियमित करण्यात आल्या असल्याचे नुकत्याच जारी करण्यात आलेल्या शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. दि. 10 जून 2014 रोजी अथवा त्यानंतर अभावित केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेनुसार केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती मिळण्याची संधी मिळणार आहे. तसेच सरळसेवा आणि विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदावर करण्यात येणारी पदभरती ही अभियोग्यता व बुद्धिमता चाचणीतील गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे.