Sat, Aug 17, 2019 16:13होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील तीन कारखान्यांवर जप्‍ती वसुलीची कारवाई 

जिल्ह्यातील तीन कारखान्यांवर जप्‍ती वसुलीची कारवाई 

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 17 2018 1:45AM जयसिंगपूर : प्रतिनिधी

थकीत एफआरपीप्रश्‍नी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन व सांगली जिल्ह्यातील दोन अशा पाच साखर कारखान्यांवर साखर आयुक्‍तांनी जप्ती वसुलीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना सोमवारी दिले. पाच कारखान्यांची एकूण 264 कोटी 9 लाख 90 हजार इतकी एफआरपी थकीत आहे. 15 टक्के व्याजासह कारखान्यांना रक्‍कम द्यावी लागणार आहे. 23 एप्रिलपर्यंत थकीत रक्‍कम देऊन कार्यकारी संचालकांना अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. तसे न झाल्यास जप्‍ती वसुलीची टांगती तलवार या कारखान्यांवर आहे. 

‘आंदोलन अंकुश’ने याप्रश्‍नी आज पुणे येथे साखर आयुक्‍त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या प्रश्‍नाबरोबरच शासन निर्णयानुसार सरासरीऐवजी कि.मी.प्रमाणे तोडणी-वाहतूक खर्चाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली होती.त्यावेळी आयुक्‍तांना हा निर्णय जाहीर करावा लागला. तसे कारवाईचे लेखी पत्र साखर आयुक्‍त संभाजी कडू-पाटील यांनी आंदोलन अंकुशला दिले.

एफआरपीची रक्‍कम न दिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, भोगावती, पंचगंगा (रेणुका शुगर्स) व सांगली जिल्ह्यातील माणगंगा (ता. आटपाडी) व महाकाली (कवठेमहांकाळ) या कारखान्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ऊस (नियंत्रण) आदेश 1966 मधील तरतुदीनुसार कारखान्यांनी गाळप गेलेल्या उसाला 14 दिवसांत किमान एफआरपीप्रमाणे शेतकर्‍यांना बिल देणे कारखान्यावर बंधनकारक असताना या कारखान्यांनी अद्याप 31 मार्चअखेर एफआरपी दिलेली नाही.  प्रवीण  माने, कृष्णांत  गोते, मनोज  राजगिरे, राकेश जगदाळे, अक्षय  पाटील, सदाशिव  महाले, नेताजी देखमुख, चंद्रशेखर  माळी, विकास  शेषवरे, उदय  होगल यांनी उपोषण सुरू केले होते. 
 

आमच्या आंदोलनाला यश
 

आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे  म्हणाले, 28 फेब्रुवारीपर्यंत शेतकर्‍यांना एफआरपीची रक्‍कम देण्याचे आदेश दिलेले होते. आम्ही  उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 9 फेब्रुवारीला साखर आयुक्‍तांनी दोन आठवड्यात निर्णय घ्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र, हंगाम संपला तरी अद्यापही काही कारखान्यांनी एफआरपीची रक्‍कम दिली नाही. याप्रश्‍नी 16 एप्रिलला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा 2 एप्रिलला साखर आयुक्‍तांना दिला होता. त्यानुसार आज आंदोलन सुरू केले होते. आमच्या आंदोलनाला अखेर यश आले.

Tags : Kolhapur, Recovery, seizure,  three, factories,  district