Mon, May 20, 2019 20:17होमपेज › Kolhapur › डॉक्टरकडून व्याजापोटी 56 लाख रु.ची वसुली

डॉक्टरकडून व्याजापोटी 56 लाख रु.ची वसुली

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 31 2018 12:55AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मुलीच्या लग्‍नासाठी हातउसने घेतलेल्या 22 लाखांच्या रकमेपोटी तब्बल 56 लाख रुपये वसूल केल्याची तक्रार एका डॉक्टरांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबत तक्रार अर्ज देण्यासाठी ते गुरुवारी रात्री राजवाडा पोलिस ठाण्यात आले होते. मात्र, याबाबत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, असे पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे यांनी सांगितले. असा काही प्रकार असल्यास तपास करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही खोचे म्हणाले.

शासकीय इस्पितळात काम करणार्‍या एका डॉक्टरांना 2016 साली मुलीच्या लग्‍नासाठी पैशाची आवश्यकता होती. त्यांनी नात्यातील एका महिलेला याबाबत विचारणा केली. बँकेतून पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने त्यांनी एका महिलेकडून हातउसने 22 लाख रुपये घेतले. या महिलेच्या आडून काही सावकारांनी पैसे दिल्याची चर्चा आहे. पैशाच्या व्याजापोटी मागील तीन वर्षांत तब्बल 56 लाखांची वसुली करण्यात आली आहे. तसेच मुद्दल 22 लाख रुपये द्यावी लागेल, असा तगादा संबंधित महिलेने लावल्याची चर्चा सुरू आहे. डॉक्टर व त्यांचे कुटुंबीय गुरुवारी रात्री जुना राजवाडा पोलिस ठाण्याबाहेर आल्याची माहिती 
मिळताच, संबंधित महिला काही समर्थकांसह पोलिस ठाण्याजवळ आली होती. 

तथ्य आढळल्यास गुन्हा दाखल करणार : मानसिंग खोचे 
याबाबत पोलिस निरीक्षक खोचे यांना विचारले असता ते म्हणाले, अशा सावकारीच्या तक्रारीचा अर्ज अद्याप मिळालेला नाही. अशी चर्चा ऐकण्यात आली आहे. संबंधितांना पोलिस ठाण्यात बोलावून माहिती घेण्यात येईल. खासगी सावकारीचा काही प्रकार असल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल.