होमपेज › Kolhapur › क्षमता ओळखा, करिअर घडवा : कुलगुरू

क्षमता ओळखा, करिअर घडवा : कुलगुरू

Published On: May 27 2018 12:47AM | Last Updated: May 27 2018 12:41AMकोल्हापूर : प्रतिनिधी

क्षमता ओळखा आणि त्यानुसारच करिअर घडवा, असा मूलमंत्र शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी विद्यार्थ्यांना दिला. संजय घोडावत विद्यापीठ प्रस्तूत दैनिक ‘पुढारी’ आयोजित ‘एज्यु-दिशा’ प्रदर्शनाचे शनिवारी त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी संजय घोडावत विद्यापीठाचे प्रेसिडेंट संजय घोडावत प्रमुख उपस्थित होते. तुमच्या मनाला जे पटते तेच करा, दबावाखाली काही करू नका, असा सल्ला घोडावत यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘एज्यु-दिशा’ पॉवर्ड बाय  पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, पुणे असून सहयोगी प्रायोजक विश्‍वकर्मा विद्यापीठ, सहप्रायोजक चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन्स, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट असलेले हे प्रदर्शन राजारामपुरी येथील व्ही.टी.पाटील सभागृहात सोमवार (दि.28)पर्यंत दररोज सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहणार आहे. पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली होती.

तुमच्या अपेक्षा मुलांनी पूर्ण कराव्यात, असा आग्रह धरू नका, असे पालकांना आवाहन करत कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, मुलांची क्षमता समजून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा, त्याची क्षमता अधिक वृद्धिगंत कशी करता येईल, त्यासाठी त्याला  मदत करा. मुलांमधील क्षमता वाढली नाही, तर अपेक्षित यश मिळूनही काही दिवसांनंतर त्यात अपयश वाढत जाण्याची भीती असते.

डॉ. शिंदे म्हणाले, पद व पैसा या गोष्टी मेडिकल आणि इंजिनिअरिंगपेक्षा अनेक क्षेत्रातही असतात. त्याकरिता जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. विद्यार्थ्याला विचार करू द्या. भविष्य कसे घडेल हे लगेच सांगता येत नाही. लहानपणी केवळ रेषा ओढणारा मुलगा भविष्यात एखादा महान चित्रकारही होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणे आपल्या अवती-भवती असतात. यामुळे आपली स्वप्ने त्याच्यावर लादू नका, त्याला जे करावेसे वाटते, ज्यासाठीची क्षमता त्याच्यात आहेत, ज्या क्षेत्रात तो चांगले काही करेल अशी स्थिती आहे, त्यानुसारच त्याला करू द्या, असे आवाहनही त्यांनी पालकांना केले.

‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करा, असे सांगत डॉ. शिंदे म्हणाले, तुमची किंमत ही तुमच्या कौशल्यावर ठरत आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. या जगात तुम्ही जन्मला आहात, त्याचा वापर केला पाहिजे. केवळ ‘वॉटस्अप’ वापरले म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर झाला असे होत नाही. करिअरसाठी अनेक क्षेत्रे आहेत. अन्न, औषध यासारख्या क्षेत्रात तर चिरतंन संधी आहेत. करिअरसाठी कोणत्या संधी आहेत, त्या क्षेत्रांची, त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम शिकवणार्‍या संस्थांची सर्व माहिती ‘एज्यू-दिशा’ प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मिळेल असे सांगत विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यासाठी ‘पुढारी’च्या वतीने गेली आठ वर्षे भरवले जात असलेले हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

संजय घोडावत विद्यापीठाचे प्रेसिडंट संजय घोडावत म्हणाले, विद्यार्थ्यांना नवी क्षेत्रे निवडा असे सांगतो पण त्यासाठीचे पर्याय देत नाही. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातून वर्षाला जवळपास 5 हजार कोटी रुपयांचा कर सरकारला दिला जातो. पण आजही कोल्हापूर-सांगली या मार्गावर प्रवास करण्यासाठी दीड तास लागतात. याउलट चीनसारख्या देशात 400 किलोमीटरचे अंतर दोन अडीच तासात पार होते. आपण मुलभूत सुविधा देत नाही. या पायाभूत सुविधांचा विकास झाला, तर अनेक क्षेत्रात कामाची संधी मिळणार आहे. भारत हा तरुणांचा देश आहे, या तरुण शक्तीचा वापर केला तर आपण खुप पुढे जाऊ, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

केवळ नोकरीच्या मागे लागू नका, आवड असेल तर छोटे छोटे व्यवसाय सुरू करा, असे सांगत घोडावत म्हणाले, कोणताही व्यवसाय करण्यासाठी, त्यात यशस्वी होण्यासाठी वयाचा अडसर येत नाही. तुमच्या मनाला जे पटते ते करा, कोणतीही गोष्ट फोर्सने करू नका. पण जे करणार ते समजावून सांगा, आई-वडील आणि गुरूजनांचा आदर करा. शिक्षणापेक्षाही संस्कार महत्त्वाचे असतात हे नेहमी लक्षात ठेवा आणि संस्कार कधीही विसरू नका.जे करणार त्याचे काहीतरी ध्येय निश्‍चित करा, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत रहा असेही त्यांनी सांगितले. ‘हार्ड वर्क’,‘स्मार्ट वर्क’, ‘डेलीकेट’ आणि ‘डिव्होशन’ ही चार चाके आहेत. ‘डिस्पेलिन’ आणि ‘क्लिननेस’ ही स्टेपनी आहे. ‘व्हिजन आणि अ‍ॅक्शन’ हे स्टेअरिंग आहे. या सर्वांचा वापर करून योग्य वेळी ‘गिअर चेंज’ करता आला पाहिजे, असा यशस्वी होण्याचा मूलमंत्रही त्यांनी दिला.

शेतात काय पिकते, यापेक्षा बाजारात काय विकते, हे जो जाणतो तो यशस्वी होतो असे सांगत घोडावत म्हणाले, जगाला काय हवे आहे ते देण्याचा प्रयत्न आमच्या संस्थेतून केला जात आहे. 2010 मध्ये केवळ 60 विद्यार्थ्यांवर संस्था सुरू केली होती. त्यावेळी पालकांनी फी परत मागण्याचाही प्रयत्न केला. पण आम्ही त्यांना विनंती केली. आमचे ध्येय होते, त्यादृष्टीने प्रयत्न केला आणि आज या संस्थेत 16 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भविष्यात कशाची गरज आहे हे ओळखून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करणारे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. या संस्थेच्या देशभर शाखा सुरू करण्यात येणार आहे त्यासह केजी टू पीजी लर्निंग देणारे घोडावत विद्यापीठाचे अ‍ॅपही तयार करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दैनिक ‘पुढारी’चे समुह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या स्टॉलना भेट देऊन विविध संस्थांची माहिती घेतली. 

यावेळी  संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. ए. रायकर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सेंट्रल ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. शीतलकुमार रवंदळे, विश्‍वकर्मा विद्यापीठाचे डीन डॉ. सुनील डोके, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन्सचे संचालक प्रा.भरत खराटे, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रा. प्रीती जोशी,  सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सुनील धनगर, दै. ‘पुढारी’चे समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार, सहायक सरव्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार आदी उपस्थित होते.