Sun, Mar 24, 2019 10:38होमपेज › Kolhapur › डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन बैठकीत विविध विषयांना मान्यता

डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन बैठकीत विविध विषयांना मान्यता

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 12:42AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठातील पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन सल्लागार समितीची दुसरी बैठक बुधवारी झाली. चालू शैक्षणिक वर्षापासून पत्रकारिता ऑनलाईन  पदविका कोर्स, राष्ट्रीय परिषदेसह पत्रकारांसाठी कार्यशाळेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यासह डॉ. ग. गो. जाधव यांच्या पत्रकारितेवरील ग्रंथ, अल्पचरित्र, डॉक्युमेंटरी आणि  व्याख्यानमालेतील मान्यवरांच्या भाषणांच्या संपादित पुस्तकांचे नियोजन आणि सत्यशोधक पत्रकारितेच्या शिल्पकारांची संशोधनात्मक पुस्तक प्रकाशित करण्याच्या प्रस्तावांनाही सदस्यांनी बैठकीत मान्यता दिली.  अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. 

बैठकीत अध्यासनाचे सदस्य व दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे नूतन अध्यक्ष व दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ.योगेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद हॉलमध्ये बैठक झाली. 

बैठकीच्या सुरुवातीस कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी मागील बैठकीचा आढावा घेतला. पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे चेअर प्रोफेसर डॉ. रत्नाकर पंडित यांनी कार्यवृत्तांत वाचला. यावेळी प्रत्येक प्रस्तावावर सदस्यांनी चर्चा केली. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पत्रकारितेचा ऑनलाईन पदविका कोर्सला मान्यता देण्यात आली. तसेच पुढील वर्षापासून एम.ए. डिजिटल कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. पुणे येथील एमआयटीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गव्हाणे, ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विजय धारुलकर या सदस्यांनी अभ्यासक्रमाबाबत बैठकीत सविस्तर मुद्दे मांडले. पत्रकारितेसंदर्भातले देशातील हे पहिले अध्यासन असल्याचा मुद्दा मांडत सदस्यांनी व्यापक राष्ट्रीय परिषद आणि पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याच्या विषयाला मान्यता दिली. डॉ. ग. गो. जाधव यांच्या पत्रकारितेवरील सहा. प्रा. डॉ. शिवाजी जाधव यांच्या पीएच.डी. प्रबंधाचा ग्रंथ प्रकाशित करण्यासह त्यांचे अल्पचरित्र, डॉक्युमेंटरी तयार करण्यास सदस्यांनी मान्यता दिली. डॉ. ग. गो. जाधव  व्याख्यानमाला 1988 पासून सुरू आहे. या व्याख्यानमालेतील मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे संपादित पुस्तक तयार करण्याचे नियोजनही करण्यात आले. महाराष्ट्राला सत्यशोधकी विचारांची परंपरा आहे. या परंपरेला लोकाभिमुख बनवण्यासाठी दैनिक ‘पुढारी’ची भूमिका महत्त्वाची असल्याचा मुद्दा डॉ. गव्हाणे यांनी मांडला. त्यामुळे सत्यशोधकी पत्रकारितेच्या शिल्पकारांचे पुस्तक अध्यासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात यावे, या आयत्यावेळी मांडण्यात आलेल्या  विषयाला  बैठकीत मंजुरी देण्यात आली. ऑनलाईन पत्रकारिता कोर्सचा प्रारंभ लवकरच करण्याविषयी सदस्यांनी चर्चा केली.

बैठकीत दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत व शैक्षणिक कार्यक्रमांबाबत सूचना केल्या. या सूचनांना सदस्यांनी मान्यता दिली. अध्यासनाच्या वतीने संशोधनाचे प्रकल्प राबवण्याचे नियोजन करण्याविषयी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी मांडलेल्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाली. अध्यासनाची सर्वसोयीनियुक्‍त आणि स्वतंत्र इमारतीबाबत चर्चा झाली. 

या चर्चेत ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. रमेश जाधव,  वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार आदींनी सहभाग घेतला. अध्यासनाची वेबसाईट  तसेच माहिती पुस्तिका तयार करण्याच्या सूचनांवर चर्चा झाली. यावेळी विद्यापीठाच्या पॅनेलवरील आर्किटेक्ट जीवन बोडके यांनी नियोजित इमारत आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, सहा. प्रा. डॉ. शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.