Tue, Mar 26, 2019 11:41होमपेज › Kolhapur › रामोशी समाजाचे संसार उद्ध्वस्त केल्यानेच वडगावात सत्तांतर

रामोशी समाजाचे संसार उद्ध्वस्त केल्यानेच वडगावात सत्तांतर

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 12:45AMपेठवडगाव : वार्ताहर

जमिनी हडप करून आपले इमले उभारणार्‍या प्रस्थापितांना गोरगरीब रामोशी समाजाचा तळतळाट लागल्यामुळे वडगाव नगरपालिकेवर विरोधी युवक क्रांती महाआघाडीला सत्तेचा मुकुट मिळाला असल्याचा घणाघाती आरोप नरवीर उमाजी नाईक सुधारक मंडळाचे राज्य अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी केला.

येथील नगरपालिका चौकात बंडखोर सेनेच्या वतीने विद्रोही परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक शिवाजीराव आवळे होते तर युवक क्रांती महाआघाडीचे मार्गदर्शक आर. डी. पाटील, नेत्या प्रविता सालपे, उपनगराध्यक्ष अजय थोरात, नगरसेवक संतोष गाताडे, राष्ट्रवादीचे संभाजीराव पोवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

संस्थापक शिवाजीराव आवळे यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत बंडखोर सेनेतर्फे हातकणंगले विधानसभेसाठी स्वतः उभे राहणार असल्याचे जाहीर केले. आवळे यांनी भाजपा सरकारवर टीकेची राळ उडविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशी दौरे बंद करून राज्यातील शेतकर्‍यांचा अभ्यास करावा, तरच शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील अन्यथा मंत्रालयालाच्या इमारतीला जाळी बसविण्याची लाजिरवाणी वेळ आली नसती अशी खंत व्यक्‍त केली. 

यावेळी संग्रामसिंह आडकूरकर, सुभाष शिलवंत, अशोक वायदंडे, संभाजीराव पोवार, नगरसेवक संदीप पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा.आनंद हाबळे यांनी सूत्रसंचालन केले.