नृसिंहवाडी : प्रतिनिधी
हातकणंगले लोकसभा मतदार संघातून भाजपचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षश्रेष्ठी यांनी तसा आदेश दिल्यास रिंगणात उतरू व राजकीय स्वार्थासाठी आंदोलन छेडणार्यांचा यावेळी मतदार पर्दाफाश करतील, असा विश्वासही कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
मंत्री खोत म्हणाले, बहुजन समाजाचे प्रश्न घेऊन शासनामध्ये मी काम करीत आहे. दूध दराचा प्रश्न गेले काही महिने आमच्यासमोर होता. यासाठी केंद्रीय स्तरावर चर्चा होऊन दूध अनुदानाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करून निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न वारंवार यशस्वी होत नाही. शेतकर्यांच्याबरोबर इतर घटकांचा विचारही केला गेला पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यात दूध संघाची आता कसोटी आहे. मूळ दर व अनुदान संघाना देणे क्रमप्राप्त आहे. खा. राजू शेट्टी यांनी भाजपची साथ सोडून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे हे निदर्शनास आणून देताना मंत्री खोत म्हणाले, प्रत्येक वेळेस लाटेवर स्वार व्हायचे व पोळी भाजून घ्यायची हे दिवस कायमपणे राहत नाहीत.
आजपर्यंत खा. शेट्टी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला शिव्याची लाखोली वाहिली आहे. तेच खासदार काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसतील तर जनता त्यांना योग्य धडा शिकवेल. आपल्यापेक्षा मोठा कोणी होऊ नये, या अविर्भावात ते वावरतात. महाभारतातील शकुनी मामांची उपमाही त्यांनी खा. शेट्टी यांना दिली.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने शेतकर्यांची बाजू घेतली. उत्पादन खर्चाला 50 टक्के भाव देण्याचा धाडसी निर्णय घेतला. उसाच्या वाढीव एफआरपीची घोषणा केली. त्यामुळे ऊस दराचा प्रश्न निकालात निघाला. राज्यात जलशिवार योजना राबविली. 16 हजार गावे टँकरमुक्त केली. सिंचन योजनेला निधी उपलब्ध करून दिला. गोरगरीब दीनदलित प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. ऊठसूठ आंदोलन करणार्यांची आंदोलने कायमची बंद व्हावीत, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले. हातकणंगले मतदारसंघात आपण लवकरच व्यापक दौरा करीत आहोत, अशी घोषणाही मंत्री खोत यांनी केली.