Sun, Mar 24, 2019 23:05
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › राऊतवाडी धबधबा होतोय बदनाम!

राऊतवाडी धबधबा होतोय बदनाम!

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 11 2018 11:23PMराधानगरी : नंदू गुरव

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यासह सीमाभागातील वर्षा पर्यटनासाठी लोकप्रियता मिळवलेल्या राधानगरी परिसर व राऊतवाडी धबधबा काही अविचारी युवा पर्यटकांच्या अतिरेकी कृत्यामुळे आपली नैसर्गिक ओळख व महत्त्व हरवत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. 

राधानगरी ....म्हणजे हमखास पाउस. सह्याद्रीच्या उंच डोंगररांगातून कोसळणारे धबधबे, राधानगरी धरण आणि खास करून राऊतवाडी धबधबा यामुळे घाटातुन नजरेच्या टप्प्यापर्यन्त दिसणारे सौंदर्य आणि बेफामपणे कोसळणार्‍या पावसाच्या सरिमध्ये ओलेचिंब होण्यासाठी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धबधब्यासाठी प्रसिद्द असणार्‍या अंबोलीपेक्षाही राधानगरीपासून थोड्या अंतरावर असणार्‍या राऊतवाडी धबधब्याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. परंतु या वाढणार्‍या पर्यटकांसोबतच मद्यधुंद व बेधुंद युवकांची मानसिकताही येवून थडकली आहे. धबधब्याजवळ उपस्थित महिला व तरुनींकडे पाहून अश्लील हावभाव करणे, टोमणे मारणे आदींमुळे रोज नव्या वादाला तोंड फुटत आहे. त्यातच मद्यधुंद तरुणानी फोडलेल्या मद्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थांची नासाडी यामुळे हा धबधबा आपले नैसर्गिक रूपच हरवू लागला आहे. 

त्यामुळेच गेल्या काही वर्षात सुटीच्या दिवसातील अपघातांचे प्रमाण या विभागात वाढलेले आहे. आशा अपघातामध्ये काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. रस्त्यावरील अपघाताबरोबरच अतिउत्साही तरुण धबधब्याजवळील कड़ेकपारीतुन वर चढण्याच्या नादात धबधब्याच्या प्रवाहात कोसळून कित्येक जण जखमी झाले आहेत तर काहीना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशा अतिउत्साही बेधुंद युवकानी निसर्गाचा आनंद मनसोक्त लुटावा पण  अशा कृत्यामुळे राऊतवाडीचे आणि पर्यायाने राधानगरीचे नाव पर्यटन क्षेत्रात बदनाम होऊ नये हीच इथल्या नागरिकांची अपेक्षा आहे.

बेधुंद तरुणाईला कारवाईच्या बे्रकची गरज

शनिवार-रविवार या सुट्ट्यांबरोबरच इतर शासकीय सुट्टीदिवशी येथे प्रचंड गर्दी होते. रस्त्यावरून येतानाच कर्णकर्कश हॉर्न वाजवित येणारे मद्यधुंद तरुणांचे जत्थे इतके बेधुंद झालेले असतात की, त्याना आपल्या अंगावरच्या वस्त्रांचेही भान असत नाही. असे बेधुंद युवक रस्त्यावरून कोणतेही वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे अशा हुल्‍लडबाज, बेधुंद तरुणाईवर पोलिसांनी वेळीच कारवाई करण्याची गरज आहे.