Mon, Aug 19, 2019 00:40होमपेज › Kolhapur › राऊतवाडी धबधब्याला मिळणार नवा लूक

राऊतवाडी धबधब्याला मिळणार नवा लूक

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 11:17PMराशिवडे : प्रतिनिधी

निसर्गरम्य आणि हिरवाईने नटलेल्या राधानगरी अभयारण्यामध्ये उंचावरून फेसाळणार्‍या राऊतवाडीच्या धबधब्याजवळ सोयी-सुविधांचा नवा लूक दिला जात आहे. सुमारे पन्‍नास लाख रुपये खर्चून पेव्हिंग ब्लॉक, रोलिंग, चेंजिंग रूम आदी कामे करण्यात येत असून नव्या लूकमुळे धबधब्याखाली भिजण्यासाठी सोपा मार्गही तयार करण्याचे काम सुरू असून पंधरा दिवसांतच सुशोभिरणाची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

राधानगरीच्या  निसर्गरम्य कोंदणातून राऊतवाडीचा धबधबा फेसाळत वाहत आहे. गेल्या 15 वर्षांपासून हा धबधबा विशेष चर्चेत आला. या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना कसरतच करावी लागत होती. मोठमोठे खडक, झाडी असल्याने पर्यटकांना तिथंपर्यंत सहज पोहोचता येत नसे. त्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून सुशोभिकरण व सुविधांसाठी पन्‍नास लाखांचा निधी मंजूर होऊन कामांना गतीही आली आहे.धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी सिमेंट रस्ता, रोलिंग, पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. झाडाझुडपांचा अडसर दूर करत पर्यटकांना भुरळ पाडणार्‍या या धबधब्यापर्यंत फिरत-फिरत निसर्गाचा आस्वाद घेता येणार आहे.

2015 या सालामध्ये निसर्गाच्या कोंदणात लपलेला हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यातील पंचेचाळीस दिवसांत पस्तीस हजार पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे; पण बघता-बघता आता ही संख्या सव्वा लाखाच्या पलीकडे गेली आहे. हे लक्षात घेऊनच याठिकाणी पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने सुरू असणारे काम पर्यटन वाढीस पूरक ठरणार आहे.