Thu, Nov 22, 2018 16:07होमपेज › Kolhapur › राऊतसह तिन्ही संशयितांची कोल्हापुरात होणार चौकशी

राऊतसह तिन्ही संशयितांची कोल्हापुरात होणार चौकशी

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी

स्फोटकासह 20 देशी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने नालासोपारा येथे छापा टाकून अटक केलेल्या वैभव राऊत, शरद कळसकरसह अन्य संशयितांचे कोल्हापूर कनेक्शन चौकशीत उघड होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयितांना ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. शनिवारी वरिष्ठ सूत्रांकडून त्याला दुजोरा देण्यात आला.

संशयित शरद भाऊसाहेब कळसकर याचा चार वर्षांपासून कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात साथीदारांसह वावर होता. लेथ मशिन फिटरचा अभ्यासक्रमही त्याने कोल्हापूर जिल्ह्यात पूर्ण केला आहे, अशीही माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांना मिळाली आहे. कळसकरसमवेत वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर व अन्य दोन साथीदार अनेकवेळा कोल्हापूर, सांगलीला येत होते, अशीही माहिती मिळाली आहे.

संशयित वेगवेगळ्या संघटनांच्या संपर्कात!

संशयित तीन वेगवेगळ्या संघटनांचे सक्रिय कार्यकर्ते असल्याची माहितीही एटीएस चौकशीत निष्पन्‍न झाली आहे. केंद्र, राज्य गुप्तचर यंत्रणांसह सीबीआय, राज्य एसआयटी, कर्नाटक सीआयडीचे वरिष्ठाधिकारी एटीएसच्या संपर्कात असल्याचेही वरिष्ठ सूत्रांकडून समजते.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येच्या कटात राऊत, कळसकरसह संशयितांचा सहभाग असावा का, असा तीनही वेगवेगळ्या तपास यंत्रणांचा संशय आहे. राऊत व साथीदारांना 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडीची मुदत संपण्यापूर्वीच कॉ. पानसरे हत्येप्रकरणी राऊत, कळसकरसह इतर संशयितांचा ताबा मिळण्यासाठी सोमवारी (13 ऑगस्ट) न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचेही वरिष्ठ सूत्रांकडून समजते.

स्थानिक सहकारी कोण?

संशयित कळसकर कोल्हापूर, सांगली, सातारा येथे बहुतांश काळ वास्तव्याला होता, असेही चौकशीत उघड झाल्याने तो नेमका कोणत्या संघटनेच्या संपर्कात होता? त्याच्यावर कोणती जबाबदारी होती? वास्तव्याचे नेमके ठिकाण, स्थानिक सहकारी कोण होते? ज्या संस्थेत त्याने अभ्यासक्रम पूर्ण केला, त्याचीही माहिती घेण्यात येत आहे.