Fri, Jul 19, 2019 01:37होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : राऊत कुटुंबाची ‘पुरोगामी वास्तुशांती’

कोल्हापूर : राऊत कुटुंबाची ‘पुरोगामी वास्तुशांती’

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 19 2018 12:11AMकोल्हापूर : सुनील सकटे 

सुशिक्षीत आणि स्वत: परिवर्तनवादी पुरोगामीत्वाचा टेंभा मिरविणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम राजारामपुरी मातंग समाजातील राऊत कुटुंबीयांनी केले आहे. कर्मकांड आणि धार्मिक विधींना फाटा देत आपल्या नव्या वास्तूत अंध मुलांच्या हस्ते फित कापून गृहप्रवेश करून या कुटुंबाने एक आदर्श निर्माण केला आहे. डॉ. आंबेडकर जयंतीदिनी हा आगळा वेगळा उपक्रम करून या कुटुंबाने खर्‍या अर्थाने आंबेडकरांना अभिवादन केले आहे. 

राऊत कुटुंबीय साधे सरळ, आई राधाबाई यांनी फळविक्री करून तिन्ही मुलांना शिक्षीत केले. मात्र, केवळ एक पदवीधर झाला. उर्वरित दोघांचे शिक्षण अर्धवट राहिले. मुरलीधर राऊत शिवाजी विद्यापीठात शिपाईपदी नोकरीस तर मधुकर राऊत  झाडू कामगार, एक फळ विक्रेता. आपले शिक्षण अर्धवट झाल्याने मुरलीधरने आपला मुलगा नवीन याला शिक्षीत करण्याचे ध्येय उराशी बाळगले. नवीनने शिक्षणासह समाज प्रबोधनाची कास धरली याची सुरुवात आपल्या घरातून सुरू केली. तिन्ही भावांनी वडिलार्जीत घर बांधले. घरातील वयोवृद्धांनी वास्तुशांतीसाठी मुहूर्त शोधाशोधा सुरू केली. नवीनने मात्र डॉ.  आंबेडकर जयंतीचा मुहूर्त सर्वात चांगला असल्याचे ठासून सांगत याच  दिवसी कार्यक्रम करण्याचा हट्ट केला व तो तडीसदेखील नेला. 

डॉ. आंबेडकर जयंतीदिनी कार्यक्रम 

डॉ. आंबेडकर जयंतीचा मुहूर्त साधत कोणतीही पूजा-अर्चा, धार्मिक विधी अथवा होम हवन आणि पौरोहित्य  न करता अंध मुलांच्या  हस्ते फित कापून गृहप्रवेश केला. यावेळी उभारण्यात आलेल्या मंडपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या तैलचित्रे विचारांचे फलक लावून प्रबोधनाचे कामही केले.  समाजातील सर्व घटकांना निमंत्रण देऊन यथोचित मान सन्मानही देण्याचे काम नवीनने केले. नवीनच्या या धाडसाचे आणि नव्या सामाजिक पायंड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.