Sat, Apr 20, 2019 15:52होमपेज › Kolhapur › रेशन दुकानात माल वाहतुकीस सहकार्य नाही

रेशन दुकानात माल वाहतुकीस सहकार्य नाही

Published On: Jul 24 2018 1:32AM | Last Updated: Jul 24 2018 1:18AMकोल्हापूर : प्रतिनिधी

विविध मागण्यांसाठी पुकारलेले देशव्यापी चक्‍काजाम आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच असून रेशनिंग दुकानांमध्ये मालाची वाहतूक करण्याला सहकार्य करणार नसल्याची भूमिका लॉरी ऑपरेटर असोसिएशनने घेतली आहे. परगावाहून होणारी मालाची आवक बंद असून जीवनावश्यक मालाची टंचाई जाणवू लागली आहे. बंदमुळे महामार्गावर परराज्यांतील ट्रक थांबून आहेत. डिझेलचा खप  70 टक्क्यांनी कमी झाला आहे. दरम्यान, या आंदोलनाला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने पाठिंबा दर्शवला आहे. औद्योगिक वसाहतीमधील निर्यात माल पडून असल्याने त्याचा फटका उद्योगांना बसत आहे. 

विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने देशव्यापी चक्‍काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. 20 जुलैपासून सुरू झालेल्या या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हजारांहून अधिक ट्रकचालक सहभागी झाले आहेत. बंद काळात कोणत्याही ट्रकमधून मालाची वाहतूक होऊ नये, यासाठी लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या वतीने भरारी पथके तयार केली आहेत. जी वाहने मालाची वाहतूक करताना सापडत आहेत, त्या वाहनांच्या चाकांची हवा सोडली जात आहे. रविवारी काही वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर सोमवारी ट्रकमधून मालाची वाहतूक पूर्णपणे बंद होती. 

दरम्यान, लॉरी ऑपरेटर असोसिएशन व विविध व्यापारी संघटनांची सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार व पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या उपस्थितीत कार्यालयात बैठक झाली.या बैठकीत रेशन दुकानातील धान्यपुरवठा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सुभेदार यांनी रेशन दुकानासाठी जे ट्रक माल घेऊन जातील त्यांना विरोध न करण्याचे आवाहन केले. याबाबत सुभाष जाधव यांनी हे चक्‍काजाम आंदोलन देशव्यापी आहे.

स्थानिक पातळीवर आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. रेशन दुकानांसाठी माल वाहतुकीला आमचा विरोध कायम राहील, असे सांगितले. कोल्हापूर शहर व जिल्ह्यात रेशनची 1574 दुकाने आहेत. या दुकानांमध्ये शासकीय गोडावूनमधून प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेपासून महिनाअखेरपर्यंत माल पोहोचवला जातो; पण ट्रक चालकांच्या बंद आंदेलनामुळे मालाची वाहतूक बंद आहे. त्यामुळे पुढच्या महिन्यासाठी पाठवण्यात येणारा माल गोडावूनमध्येच पडून आहे. 

अद्याप परिणाम नाही : कोरगावकर 

घाऊक व्यापार्‍याकडे एक आठवडा पुरेल इतका धान्याचा साठा आहे.  अजून चार दिवस पुरेल इतका धान्याचा साठा आहे. आंदोलन सुरू राहिले, तर परिणाम जाणवण्याची शक्यता आहे, असे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी सांगितले.

चेंबर ऑफ कॉमर्सचा पाठिंबा 

मालवाहतूकदारांचे प्रश्‍न सोडवण्यात यावेत, अशी मागणी  दोन वर्षांपासून होत आहे; पण सरकार  लक्ष देण्यास तयार नाही. या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय शेटे यांनी पत्रकात म्हटले आहे.

डिझेल खपावर परिणाम : माणगावे

ट्रकचालकांच्या आंदोलनामुळे डिझेलच्या खपावर परिणाम झाला आहे. डिझेलची सर्वाधिक मागणी ट्रकचालकांकडून होत असते, असे डिझेल-पेट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी सांगितले.

औद्योगिक वसाहतीवर परिणाम 

 चक्‍काजाम आंदोलनाचा उद्योगांना  फटका बसू लागला आहे. फौंड्रीसाठी लागणार्‍या कच्चा मालाची आवक थांबली आहे. तसेच तयार  माल कारखान्यातच पडून आहे. दोन दिवसांनंतर कारखान्यात कच्च्या मालाची आवक झाली नाही, तर  उत्पादन प्रक्रिया बंद पडणार आहे, असे सुरेंद्र जैन यांनी सांगितले.

ट्रकचालकांना फळे, जेवण वाटप

शिये : चालक-क्लीनर यांची उपासमार होऊ नये, यासाठी नागाव शिरोली ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने सोमवारी सकाळी फळे, तर रात्री जेवणाची सोय करण्यात आली. यावेळी प्रभाकर येद्रे, अमोल लोंढे, हरिष जाधव, अस्लम देसाई, अजित शिर्के, मारुती राठोड उपस्थित होते. चक्‍काजाम आंदोलनामुळे  महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर ट्रकच्या रांगा लागल्या आहेत. 

वाहतूक संस्था बंदच

गांधीनगर : आंदोलनास गांधीनगर गूड्स ट्रान्स्पोर्ट मालक संघाने पाठिंबा दिला असून चौथ्या दिवशीही येथील वाहतूक संस्था बंद राहिल्या. संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. माल उतरवून घेताना मज्जाव करण्यासाठी सोमवारी मोटार मालक संघाचे आयुब मुजावर, विलास पाटील, संतोष तावडे, मनोहर शिंदे, अनुप महाजन यांनी प्रयत्न केले. त्यांनी ट्रकासमोरच उभे राहून आपला विरोध दर्शवला अन् माल उतरवण्यास मज्जाव केला.

कामगारांवर उपासमारीची वेळ

दरम्यान, आंदोलनाचा चौथा दिवस असल्याने माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाहतूकदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शासनाने त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी माथाडी कामगारांसह मोटार मालक संघाकडून होत आहे. 

महामार्गावर मालवाहतूक ठप्प

उजळाईवाडी :  देशव्यापी चक्‍काजाम आंदोलनाच्या चौथ्या दिवशी गोकुळ शिरगाव औद्यागिक वसाहत, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत गांधीनगर व्यापार पेठ, तसेच शिरोली औद्योगिक वसाहतीत येणारी मालवाहतूक थांबली आहे.

गुन्हे मागे घेण्याची मागणी

रविवारी लॉरी असोसिएशनच्या काही सदस्यांनी महामार्गावरील ट्रक अडवून चाकातील हवा सोडली. यावेळी पोलिस व असोसिएशनच्या सदस्यांमध्ये वादावादी झाली. या प्रकरणी काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, यासाठी असोसिएशनच्या सदस्यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण ते कार्यालयात नसल्याने मंगळवारी यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे सुभाष जाधव यांनी सांगितले.

जयसिंगपुरात गुरुवारी चक्‍काजाम

जिल्हा मोटार मालक महासंघातर्फे वाहतूकदारांच्या विविध मागण्यांप्रश्‍नी येथे गुरुवारी सकाळी 10 वाजता क्रांती चौकात, तर अंकली टोलनाक्यावर दुपारी चक्‍काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.