होमपेज › Kolhapur › डोळ्यांदेखत स्वप्नांची राखरांगोळी

डोळ्यांदेखत स्वप्नांची राखरांगोळी

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 26 2018 12:38AMकोल्हापूर : गौरव डोंगरे

आयुष्यातील उभारीच्या वयात कलादेवतेची साधना केली... सात ते आठ वर्षांच्या साधनेतून कुंचल्याच्या जादूने अनेक चित्रे साकारली... चित्रांनी प्रतिष्ठा, मान-सन्मान एवढेच काय, पोटाला रोजगार मिळवून दिला... पण एका अघटित घटनेने आयुष्याच्या या अनमोल ठेव्याला नजर लागली. रविवारी लागलेल्या एका आगीने नवोदित चित्रकारांच्या स्वप्नांचीच राखरांगोळी केली. 

रविवारी सकाळी लक्ष्मीपुरीतील तीन मजली इमारतीला आग लागली. दुसर्‍या मजल्यावरील सुमारे दहा लाखांचे साहित्य जळून खाक झाले. यामध्ये दळवीज् आर्ट इन्स्टिट्यूटच्या सहा विद्यार्थ्यांची चित्रे जळाली. ही केवळ चित्रे नव्हती, तर त्यांची स्वप्नेच आगीत जळाल्याचा अनुभव आला. 

कोकणातील सिंधुदुर्गचे सूरज शेलार (कुडाळ) व रामचंद्र मेस्त्री (वेंगुर्ला) या दोघांनी दळवीज् आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये पाच वर्षांचा जी. डी. आर्ट कोर्स पूर्ण केला. गेली दोन वर्षे ते कोल्हापुरात राहून चित्रकार म्हणून कामे करत आहेत. महाविद्यालयीन जीवनापासून आजपर्यंत त्यांचा चित्रांचा अनमोल साठा सोबतच होता. 

घराची अडचण

सूरज आणि रामचंद्र यांची कोकणातील राहती घरे मातीची आहेत. यामुळे दोघांनी सर्व चित्रे तिकडे न नेता स्वत:सोबतच ठेवली होती. यापूर्वी भाडेकरू म्हणून राहत असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी ही चित्रे त्यांनी जीवापाड जपून सांभाळली होती. 

पुरस्कार विजेती चित्रे

मागील सात वर्षांत दोघांनी साकारलेली 3 हजारांहून अधिक चित्रांचा खजिना या ठिकाणी ठेवला होता. सूरज शेलार याच्या अनेक चित्रांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. सूरजच्या व्यक्‍तिचित्राने प्रफुल्‍ल डहाणूकर इंडियन नॅशनल आर्ट फौंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. तर रामचंद्र मेस्त्री याच्या चार फूट बाय साडेतीन फुटाच्या ‘दशावतार’ या रचना चित्राला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

गेली सात-आठ वर्षे दोघेही चित्रकलेचा हा वारसा जीवापाड जपत होते. रविवारी ते राहत असलेल्या इमारतीला आग लागली तेव्हा दोघेही बाहेर गेले होते. त्यांचे सहकारी मित्र कृष्णा म्हेतर, भूषण म्हापणकर, पंकज गवंडे, गणेश राऊळ खोलीमध्ये झोपले होते. आग लागल्यानंतर सर्वजण धावत इमारतीतून खाली आले. चित्रांचा ठेवा स्वत:च्या डोळ्यांसमोर जळताना पाहून सर्वच जण हवालदिल झाले. 

या चित्रकार मित्रांसाठी आता कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेचे हेच शब्द सुचत आहेत. ‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून आता तुम्ही फक्‍त लढ म्हणा.’