Sun, Jun 16, 2019 02:44होमपेज › Kolhapur › वृध्द महिलेवर बलात्‍कार प्रकरणी कोल्‍हापूरात एकास जन्‍मठेप

वृध्द महिलेवर बलात्‍कार प्रकरणी कोल्‍हापूरात एकास जन्‍मठेप

Published On: Mar 17 2018 2:38PM | Last Updated: Mar 17 2018 2:48PMकोल्हापूर : प्रतिनिधी

वयाची नव्वदी पार केलेल्या आणि अंथरुणावर मरणासन्‍न अवस्थेत खिळलेल्या वृद्धेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गारगोटी (ता. भुदरगड) येथील नराधमाला जिल्हा, सत्र न्यायालयाने शनिवारी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. विष्णू कृष्णा नलावडे (वय 54, रा. कोळसे गल्ली) असे त्याचे नाव आहे. जिल्ह्यातील बहुचर्चित लैंगिक अत्याचार खटल्यातील तपासात राहिलेल्या त्रुटीकडे लक्ष वेधत न्यायालयाने पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले.

जिल्हा व सत्र न्यायाधीश (2) आदिती कदम यांनी दुपारी खटल्याचा निकाल दिला. सरकारी अभियोक्‍ता अ‍ॅड. ए. एम. पिरजादे, अ‍ॅड. अमृता पाटोळे यांनी शारीरिकद‍ृष्ट्या कमकुवत, मरणासन्‍न अवस्थेत अंथरुणाला खिळलेल्या वृद्धेवर विकृती मनोवृत्तीने पछाडलेल्या नराधमाने माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केल्याचा युक्‍तिवाद करून नराधमाला फाशीची शिक्षाच योग्य असल्याची मागणी केली होती.

फाशीच्या शिक्षेसाठी मागणी करताना अभियोक्‍तांनी देशभरात गाजलेल्या विविध खटल्यांच्या निकालांच्या संदर्भासह महत्त्वपूर्ण कागदपत्रेही सादर केली. सरकारी अभियोक्‍तांच्या आक्रमक युक्‍तिवादामुळे खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात सकाळपासूनच तुडुंब गदी झाली होती. दुपारी 1.40 वाजता न्यायालयाने आरोपीला आजन्म कारासावाची शिक्षा सुनावली. भुदरगड तालुक्यात दि. 4 मार्च 2015 मध्ये घडलेल्या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपी पिडीत वृध्देच्या घरात घुसला.  नव्वदी ओलांडलेली वृध्दा आजारपणामुळे अंथरूणावर खिळून होती. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत अत्याचार केला. महिलेने आरडा-ओरड करताच नातेवाईकासह ग्रामस्थ धावून आले. संतप्त जमावाने त्याची धुलाई करून पोलिसांच्या स्वाधिन केले होते.

भुदरगड पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.पिरजादे व श्रीमती पाटोळे यांनी वैद्यकीय अधिकार्‍यासह नऊ साक्षीदार तपासले. अभियोक्त्यांनी न्यायालयासमोर सादर केलेले वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे, प्रत्यक्षातील पुरावे ग्राह्य मानून न्यायाधिश कदम यांनी दि.6 मार्चला आरोपीला दोषी ठरविले होते.

सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.ए.एम.पिरजादे, अ‍ॅड पाटोळी यांनी आज, दुपारी बारा वाजता न्यायालयात युक्तीवाद केला. आई, आजीसमान असलेल्या वृध्देवर आरोपीने अमानुष अत्याचार केला आहे. माणूसकीला काळीमा फासणारी घटना असल्याने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. पिडीत महिलेच्या वारसांना आरोपीकडून नुकसान भरपाई मिळावी, अशीही त्यांनी मागणी केली. आरोपीच्यावतीने अ‍ॅड.पी.एम.पाटील यांनी युक्तीवाद केला.