Sun, May 26, 2019 09:32होमपेज › Kolhapur › खंडणी : जयसिंगपूरच्या पोलिसासह तिघांवर गुन्हा

खंडणी : जयसिंगपूरच्या पोलिसासह तिघांवर गुन्हा

Published On: Mar 03 2018 1:49AM | Last Updated: Mar 03 2018 1:19AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

बिल्डरकडून चार लाख रुपये उकळून पुन्हा आठ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार अनिल चव्हाण याच्यासह तिघांविरुद्ध लक्ष्मण दादासाहेब कवाळे (वय 28, रा. भारत पेट्रोल पंपाजवळ, आरग, ता. मिरज) यांनी तिघांविरुद्ध फिर्याद दिली आहे. वैभव खामकर, विकी खामकर (रा. जयसिंगपूर) अशी अन्य दोन संशयितांची नावे आहेत.
जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2018 या कालावधीत अनेकदा जयसिंगपूर तसेच कोल्हापूर येथे समक्ष व फोनवर आठ लाखांची मागणी केली. पैसे कसे काढायचे ते बघतो, अशी धमकी दिल्याचे कवाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

जयसिंगपूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी वैभव खामकर याने बिल्डर कवाळे यांना, मी तुम्हाला डॉक्टर सुकुमार मगदूम यांच्या कॉलेजच्या बांधकामाचे काम मिळवून दिले आहे असे सांगून, तुम्ही मला पैसे द्या, अशी मागणी करून वेळोवेळी चार लाख रुपये घेतले. मात्र, त्यानंतरही त्याच कारणावरून आठ लाख रुपये देण्याची मागणी केली. कवाळे यांनी पैसे देणार नाही, असे म्हटल्यानंतर विकी खामकर याने कोल्हापुरात फिर्यादी कवाळे यांच्या मोटारीच्या आडवी मोटार मारून, तू माझ्या भावाचे पैसे दे, नाहीतर मी तुला सोडणार नाही, पैसे कसे काढायचे ते बघतो..., अशी धमकी दिली. 

त्याच्यासोबत असलेल्या  चव्हाण या पोलिस कर्मचार्‍याने फिर्यादी कवाळे यांना, तुमचा काय विषय असेल ते मिटवा, त्यांचे पैसे देऊन टाका, असे सांगून समक्ष व फोनवरून कवाळे यांच्याकडे पैशाची मागणी केली.

जिल्हा पोलिसप्रमुखांचा गुन्हा नोंद करण्याचा आदेश

बिल्डर कवाळे यांना आठ लाख रुपयांसाठी वारंवार होत असलेल्या धमकीमुळे त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांपर्यंत धाव घेतली. जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांनी संशयित आरोपी  खामकर, पोलिस चव्हाण व कवाळे यांच्यात झालेल्या फोनवरील संभाषणावरून कॉल डिटेल्स तपासून व पडताळणी करून खात्री केल्यानंतर गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम करीत आहेत.