Thu, Apr 25, 2019 05:36होमपेज › Kolhapur › #Women’sDayआधुनिक सावित्रीच्या तीन लेकी

#Women’sDayआधुनिक सावित्रीच्या तीन लेकी

Published On: Mar 08 2018 2:05AM | Last Updated: Mar 08 2018 2:05AMदिलीप शिंदे

घरातील एक स्त्री शिकली की, संपूर्ण समाज सुशिक्षित होतो, या महात्मा ज्योतिबा फुले व स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेने शैक्षणिक उत्क्रांती घडली आणि स्त्रियांनी झेप घेतली. ही किमया फक्त शिक्षणामुळेच घडू शकते, हे ओळखून धुळे-नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यांत आपल्या पत्नीसह तीन मुलींना उच्च शिक्षित करून देशकार्यासाठी प्रोत्साहित करणारे साहेबराव सूर्यवंशी हे खर्‍या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मार्गाने शैक्षणिक कार्य करीत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. या ग्रामीण भागातील शिक्षकाने समाजाकडून मिळणार्‍या हेटाळणीला आव्हान समजून पत्नीला उच्च शिक्षित करून शिक्षण विभागाच्या उपसंचालक बनविले. त्या मातेने आपल्या तिन्ही मुलींना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, विक्रीकर उपायुक्त बनवून आधुनिक सावित्रीबाईंची झळक दाखवून दिली. आधुनिक काळातील या सावित्री व तिच्या सरकारी पदावर विराजमान असलेल्या तीन लेकींचा 8 मार्च या महिलादिनानिमित्त उलगडलेला हा जीवनप्रवास... 

खान्देशातील आधुनिक सावित्रीबाई म्हणून रंजना ठाकूर यांच्या कर्तृत्वाकडे पाहिले जाते. नंदुरबार जिल्ह्यामधील शहादा तालुक्यातील साहेबराव सूर्यवंशी या शिक्षक तरुणाशी विवाहबद्ध झाल्यानंतर रंजना यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुलांना शिकविता-शिकविता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या साहेबरावांनी आपल्या धर्मपत्नीची शिक्षणातील आवड आणि समाजातील गरज ओळखली आणि ती जोपासण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर सूर्यवंशी दाम्पत्य धुळे जिल्ह्यातील शिंदखेड्यामध्ये स्थलांतरित झाले आणि नव्या संसाराला सुरुवात केली. संसाराचा गाडा हाकताना जुनी मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या रंजना यांनी डी.एड.चे शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि त्याही पुढे झेड.पी.च्या शाळेमध्ये शिक्षिका बनल्या. विशेष म्हणजे, रंजना यांनी लग्नानंतर आपले आडनाव सूर्यवंशी लावण्यापेक्षा माहेरील आडनाव ठाकूर लावणे पसंद केले. आपल्या आई-वडिलांनी लहानाचे मोठे केले, शिक्षण दिले, त्यांचा वारसा पुढे जोपासण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला त्यांच्या पतीनेदेखील मान्यता दिली. त्यांच्या सुखी कुटुंबात वंदना, त्यानंतर नीलिमा आणि माधुरी या तीन मुलींनी सरस्वतीच्या रूपाने पावले टाकली आणि त्यांचे सारे जगच बदलून गेले. प्राथमिक शिक्षकांच्या घरातील शैक्षणिक वातावरणाचा प्रभाव आपोआप त्या मुलींवर पडत राहिला आणि बघता-बघता तिघींनीही प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. मुलांपेक्षा मुली कुठल्याही बाबतीत कमी नसल्याचे संस्कार त्यांच्यावर केले. शिकण्यास वयाचे बंधन नसते, हे रंजना यांनी मुलींच्या शिक्षणासोबत एम.ए., एम.एड.चा अभ्यास करून मुलींना कृतीतून आदर्श घालून दिला. त्या  सकारात्मक वृत्तीचा, चिकाटी आणि वाहून घेण्याच्या वृत्तीचा प्रभावही नकळत मुलींवर पडू लागला. या कुटुंबाच्या शैक्षणिक प्रगतीकडे समाजात नेहमीच कौतुकाने पाहिले गेले, कधीही ईर्ष्येला तोंड द्यावे लागले नाही, उलट तिघी हुशार मुली म्हणून समाजात कौतुक झाले. सुरुवातीला फक्त रंजना यांना शिकविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी बायकोला शिकवणारे समाजात जास्त लोक नव्हते म्हणून थोडीफार टीकाटिपणी झाली. नातेवाइकांनी मात्र मदतीचे हात पुढे केले. मात्र, साहेबरावांचे शिक्षक मित्र चिडवू लागले. कशाला पत्नीला शिकवतोस, ती पुढे अधिकारी होईल आणि तू प्राथमिक विभागाचा शिक्षकच राहशील, तुला बायकोची बॅग उचलायला लागेल, हे कायम लक्षात ठेव, अशा स्वरूपाच्या टाँटिंगकडे सकारात्मकदृष्टीने पाहत साहेबराव मित्रांना म्हणायचे, माझी पत्नी साहेब झाली की, तूदेखील माझी बॅग उचलशील, असे बोलून त्यांच्या टीकेकडे कानाडोळा करू लागले आणि परिणामी रंजना ठाकूर या शिक्षणाधिकारी बनल्या. त्यानंतर त्या मित्रांचाही दृष्टिकोन बदलला, पुढे त्या शिक्षण विभागाच्या उपसंचालक म्हणून निवृत्त झाल्या. आईकडील शिक्षणाचा वारसा पुढे चालविताना वंदना, नीलिमा आणि माधुरी या बहिणींचे प्राथमिक शिक्षण धुळ्यातील शिंदखेडा येथील झेड.पी.च्या शाळेत  झाले. पुढील शिक्षण  नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात झाले आणि महाविद्यालयीन शिक्षण नंदुरबारमध्ये झाले. मुलींच्या शिक्षणाचा खर्च पेलवण्यासाठी घरात ट्युशन घेणार्‍या रंजना ठाकूर यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावून मुलींच्या भविष्याचे नियोजन केले. 

मोठी मुलगी वंदना सूर्यवंशी हिने धुळ्याला डिप्लोमा केला आणि औरंगाबादमधील गव्हर्नर पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरची पदवी घेतली. लग्न झाले. 1994 ते 2001 पर्यंत एशियन ब्राऊन ब्रोवेरी आणि सिमेन्स कंपन्यांत नोकरी केली. त्यांनीदेखील नोकरी करता-करता एमपीएससीचा अभ्यास सुरू केला आणि 1998 मध्ये पहिल्या प्रयत्नात तहसीलदारपदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. 1999 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि 2001 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून अलिबागला गेल्या. प्रोबेशन पूर्ण केल्यानंतर वंदना यांनी कोकण विभागीय आयुक्त रामाराव यांच्या कार्यालयात ओएसडी (ऑफिसर ऑफ स्पेशल ड्युटी) म्हणून काम पाहिले. त्यानंतर एमएमआरडीएमध्ये बदली झाली आणि त्यांच्यावर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सोपविण्यात आली. साडेतीन वर्षांमध्ये जागतिक बँकेच्या निधीतून उभारण्यात येणार्‍या एमयूटीपी प्रकल्पातील बाधितांच्या पुनर्वसनाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडली. त्यात ठाणे-कुर्लादरम्यानची चार व पाचवी रेल्वेलाईन, जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोड, सांताक्रूझ-चेंबुर लिंक रोड या प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या कामांमुळे जनता, अधिकार्‍यांसह राजकीय मंडळींच्या मानसिकतेचा अभ्यास झाला आणि त्याचा फायदा ठाणे जिल्ह्याच्या पहिल्या निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) म्हणून काम करताना होत आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह केंद्र, राज्यातील मंत्र्यांचा प्रोटोकॉल सांभाळणे, दौर्‍याचे नियोजन करण्याचे काम वंदना सूर्यवंशी लीलया पेलत आहेत. प्रामुख्याने शासनकर्ते, प्रशासन आणि जनतेमधील समन्वय साधण्याचे महत्त्वपूर्ण काम या पदावरील व्यक्तीला 24 तास करावे लागते. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्‍विनी जोशी यांच्या कार्यकालात सप्टेंबर 2015 मध्ये त्या ठाण्यात आरडीसी म्हणून रुजू झाल्या. त्यापूर्वी त्यांनी मुद्रांक शुल्क विभागात काम केले होते. योगायोग म्हणजे अश्‍विनी जोशी या रेशनिंग विभागाच्या नियंत्रक म्हणून काम करीत असताना, वंदना यादेखील त्यांच्या हाताखाली उपनियंत्रक म्हणून काम करीत होत्या. त्यावेळी प्रत्येक व्यक्तीला रेशनवरील धान्य कसे मिळेल, याची काळजी त्या घेत आणि मुंबईतील नोडल अधिकारी म्हणून त्यांनी रेशन विभागाचे डिजिटलायझेशन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.

पुरुषांपेक्षा महिला कमी नसतात, हे वंदना सूर्यवंशी यांनी आपल्या कामातून अधोरेखित केले आहे. एवढेच नाही, तर आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत लग्नानंतरही वडिलांचे आडनाव आपल्या नावापुढे कायम ठेवले आहे. मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर नीलिमा आणि माधुरी यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांना मित्र-मैत्रिणी होत्या; पण या दोघी बहिणी मैत्रिणी अधिक होत्या. दोघींनीही फिजिक्समध्ये बी.एस्सी. केली. शिक्षणाधिकारी बनलेल्या रंजना यांच्या बदलीनंतर नीलिमाने नाशिकला एमबीए (मार्केटिंग) केले, तर माधुरीने एलएल.बी.पर्यंत शिक्षण घेतले. तत्कालीन उपजिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्यामुळे एमपीएससी परीक्षेची माहिती मिळाली. सिलेक्शननंतर यूपीएससी परीक्षेच्या पॅटर्नबद्दल माहिती झाली. मुलाखतीपर्यंत जाऊन योग्य नियोजन करता न आल्याने यश मिळू शकले नाही. मात्र, एमपीएससी पहिल्या प्रयत्नात क्लेअर केल्यानंतर 2005 मध्ये नायब तहसीलदार म्हणून ठाणे जिल्ह्यात कामाला सुरुवात केली. उल्हासनगरसह अन्य तालुक्यांत पोस्टिंग झाली, तरी ती कागदावरच असायची. कारण, एमआरजीएसच्या डाटा एंट्रीच्या महत्त्वाच्या कामासाठी त्यांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातच काम करावे लागले. त्यानंतर भिवंडीत सप्लाय अधिकारी (एसआयओ) म्हणून काम केल्यानंतर तहसीलदार म्हणून बढती मिळाली. काही महिने ठाण्यात काम केल्यानंतर कुर्ला येथे अतिक्रमण विभागात वर्णी लागली आणि आता एसआरएमध्ये तहसीलदार म्हणून काम करीत आहेत. एसआरए योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता ठरविताना त्यांच्यामध्ये समन्वकाची भूमिका पार पाडावी लागत आहे. अशा या अधिकार्‍यांची एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करताना डॉ. संतोष थिटे यांच्याशी मित्रता झाली आणि त्याचे रूपांतर लग्नात झाले. थिटे हे भिवंडीमध्ये उपविभागीय अधिकारी (प्रांत) म्हणून काम करीत आहेत. त्यांच्यावर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाची मोठी जबाबदारी आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या शेजारीच मोठी बहीण वंदना सूर्यवंशी राहतात. तर तिसरी बहीण माधुरी सूर्यवंशी यांना विक्रीकर विभागात सेल टॅॅक्सचा नवीन चेहरा म्हणून ओळखले जाते.

2007-8 मध्ये नवी मुंबईत विक्रीकर उपायुक्त म्हणून रुजू झाल्या.  त्यांनी विक्रीकर विभागाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. माधुरी यांनी स्वतः प्रशिक्षण विभाग मागून घेतला आहे. विक्रीकर विभागातील महत्त्वाच्या विषयांचे प्रशिक्षण त्यांना मिळाले नाही. त्या प्रशिक्षणापासून नवीन अधिकारी वंचित राहू नयेत, ग्रामीण भागातून आलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांमधील न्यूनगंड दूर करण्याच्या दृष्टिकोनातून काम करीत आहेत. त्यांनीदेखील 2005 मध्ये धुळे जिल्ह्यात उपमुख्याधिकारी म्हणून काम केले होते. परंतु, त्यांचे मन काही रमले नाही. त्यांनी पुन्हा परीक्षा देऊन विक्रीकर उपायुक्त म्हणून नवी मुंबईत आपल्या कारकिर्दीला नवे आयाम देण्यास सुरुवात केली आहे.

अशा या आधुनिक सावित्री रंजना ठाकूर यांच्या तीन लेकी सरकारी विभागात महत्त्वाच्या पदावर आपल्या कामाची छाप सोडत आहेत. शिक्षणाची कास धरली की, जात, धर्म, ग्रामीण, शहरी वा पुरुष-स्त्री यांच्या भिंती गळून पडतात आणि कसे जग बदलण्याची जादू आपल्या हाती लागते, हे सूर्यवंशी-ठाकूर या माय-लेकींनी दाखवून दिले आहे.