Mon, May 25, 2020 23:39होमपेज › Kolhapur › 'राणे टीका थांबवा अन्यथा शिवसैनिक गप्प बसणार नाहीत'

'राणे टीका थांबवा अन्यथा शिवसैनिक गप्प बसणार नाहीत'

Published On: Dec 11 2017 1:29AM | Last Updated: Dec 11 2017 1:29AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बारा वर्षांपूर्वी शिवसेना सोडली. तरीही ते उठसूट शिवसेनेवर बोलत आहेत. शिवसेनेत असताना काय केले, याबाबत त्यांनी चरित्र लिहून प्रसिद्ध करावे, त्यांना कोणी अडवणार नाही; मात्र वारंवार मातोश्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यांनी हे प्रकार थांबवावे; अन्यथा महाराष्ट्रातील शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जनतेच्या कल्याणासाठी नव्हे, तर आमदार नितेश राणे आणि नीलेश राणे यांच्या राजकीय भल्यासाठी त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे, असा टोला कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी लगावला.

राणे यांनी  पक्षाची पहिली जाहीर सभा  कोल्हापुरात घेतली. या सभेत त्यांनी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले. या आरोपांना दुधवडकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले,  राणे आपला टीआरपी वाढवण्यासाठी शिवसेनेवर टीका करीत आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून ते सतत ‘मातोश्री’वरील गुपित आपल्याकडे आहे, योग्य वेळ आल्यानंतर ते उघड करणार, असे सांगत आहेत. त्यांनी  एकदा गुपित जाहीर करावे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत राज्यात 63 आमदार निवडून आणले. तुम्ही शिवसेनेत होता तेव्हा किती आमदार निवडून आणले, याचे आत्मपरीक्षण करावे. 

दुधवडकर म्हणाले,  शिवसेनेवर बोलावयाचे आणि प्रसिद्धी मिळवण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. सेनेवर टीका करण्यापेक्षा स्वत:च्या पक्षवाढीसाठी त्यांनी लक्ष द्यावे. आजतागायत कोणत्या राजकीय कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी सिंधुदुर्गातून केली? मग आताच पश्‍चिम महाराष्ट्र दौर्‍याची सुरुवात त्यांनी कोल्हापुरातून का केली? विनय कोरे, महादेव जानकर यांनी काढलेल्या पक्षाची त्यांनी माहिती घ्यावी. त्यानंतर शिवसेनेवर टीका करणार्‍यांनी आपला पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा, असा उपरोधिक सल्‍लाही त्यांनी राणे यांना दिला. 

शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, असे राणे म्हणतात, यावर दुधवडकर म्हणाले, राणे हे जनाधार संपलेले नेते आहेत. ‘लांडगा आला रे आला’ अशी त्यांची अवस्था आहे. त्यांनी आमच्या सत्तेबद्दल शिकवू नये. ठाकरे कुटुंबीय विधान भवनात जात नाहीत, तर माणसांना निवडून विधिमंडळात पाठवतात. 

आ. वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे यांचा जनाधार ओसरत चालला आहे. त्यामुळे  त्यांनी आपल्या मुलांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे त्यांना मुलांची चिंता लागून राहिली आहे. म्हणून त्यांनी  स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे, असे सांगून आ. नाईक म्हणाले, राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मुंबईतील काही नगरसेवक, आमदार शिवसेनेतून फुटून त्यांच्याबरोबर गेले होते; पण आता त्यातील एकही आमदार त्यांच्याबरोबर  नाही. 

आ. राजेश क्षीरसागर म्हणाले,  राणे हा राजकीय राक्षसी महत्त्वाकांक्षेने झापाटलेला माणूस आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांचा विधानसभा निवडणुकीत दोन वेळा पराभव झाला. त्यानंतर मुख्यमंत्री होणार या महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर घेतले. मंत्री केले; पण काँग्रेसच्या उपकाराची परतफेड त्यांनी केली नाही.  यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.

जिल्ह्याला मंत्रिपद देण्याची राणेंना चिंता का?

जिल्ह्यात शिवसेनेचे 6 आमदार आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून शिवसेना संपविणार अशी वल्गना राणे यांनी केली आहे. यावर  आ. क्षीरसागर म्हणाले, आगामी निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचे 8 आमदार आणि 1 खासदार निवडून आणल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही. जिल्ह्यात 6 आमदार असताना मंत्रिपद दिले नाही, अशी टीका ते करतात; पण  मंत्रिपद देण्यासाठी पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे  समर्थ आहेत, त्याची चिंता राणेंनी करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.