Fri, Apr 19, 2019 12:41होमपेज › Kolhapur › पंचगंगा, रंकाळा प्रदूषणाबाबत उपाययोजनांचे मॉनिटरिंग : कदम

पंचगंगा, रंकाळा प्रदूषणाबाबत उपाययोजनांचे मॉनिटरिंग : कदम

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 03 2018 1:24AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

पंचगंगा नदी व रंकाळा तलाव  प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठीच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या असून, त्याचा कालबद्ध कार्यक्रमही  निश्‍चित करून देण्यात आला आहे. याबाबत पुढील दोन महिने आपण स्वतः मॉनिटरिंग करणार असून, विधानसभा अधिवेशनानंतर पुन्हा याबाबत बैठक घेणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. 

रामदास कदम यांनी सोमवारी दै.‘पुढारी’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक व उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योेगेश जाधव यांनी त्यांच्याशी पंचगंगा नदी व रंकाळा तलावाच्या प्रदूषणाबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी कदम यांनी वरीलप्रमाणे आश्‍वासन दिले. रामदास कदम यांनी डॉ. योगेश जाधव यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 
यापूर्वी कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून काम केल्यामुळे या सर्व समस्या आपल्याला माहिती आहेत. आता पर्यावरण खात्याचा कार्यभार आपल्याकडे असल्याने त्या सोडविण्याचे काम आपल्या हातून निश्‍चित होईल. मात्र,त्यासाठी सततचा पाठपुरावा आणि कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सांगितले.

शिरोळ तालुक्यात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढत आहे. त्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून डॉ. योगेश जाधव म्हणाले, प्रदूषणामुळे कॅन्सरचेसंकट गंभीर बनले आहे. पुढच्या पिढीला कॅन्सरपासून वाचविण्यासाठी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करणे आणि ती सातत्याने प्रवाही ठेवणे गरजेचे आहे.  

प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने चालवा; डॉ. योगेश जाधव यांची मागणी 

डॉ. योगेश जाधव यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाबरोबरच रंकाळा तलावाच्या प्रदूषणाचाही प्रश्‍न मांडला. या दोन्ही समस्या सोडवायच्या असतील, तर संपूर्ण कोल्हापूर शहरात ड्रेनेज योजना राबविण्याची गरज असल्याचे सांगितले. पंचगंगेचे प्रदूषण रोखताना जी प्रक्रिया केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, ती पूर्ण क्षमतेने चालविण्याची गरज आहे. आजही लाईन बझार येथील 74 एम. एल. डी. क्षमतेच्या प्रक्रिया केंद्रात केवळ 55 एम. एल. डी. सांडपाण्यावर प्रक्रिया होते. हे केंद्र पूर्ण क्षमतेने चालविल्यास प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल. तसेच प्रक्रिया केलेले सांडपाणी हे शेतीला दिल्यास नदीच्या पाण्याची प्रतवारी सुधारेल. याबाबतची योजना जलसंपदा विभागाने तयार केली असून, ती राबविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

रंकाळा तलाव प्रदूषणमुक्तीसाठी नव्या प्रक्रिया केंद्राचे काम सुरू करा

रंकाळा तलावाची प्रदूषणातून सुटका करण्यासाठी चारही नाले प्रक्रिया केंद्राकडे वळविण्याचे काम झाले असले, तरी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेेने चालविले पाहिजे. चार एम. एल. डी. क्षमतेचे नवीन प्रक्रिया केंद्र मंजूर झाले असून, ते तातडीने पूर्ण केले पाहिजे. रंकाळा तलाव परिसरातील घनकचर्‍याचे व्यवस्थापन योग्यप्रकारे केले पाहिजे, अशी मागणीही डॉ. योगेश जाधव यांनी केली.

प्रदूषण रोखण्याचे काम थांबणार नाही; कदम यांची स्पष्ट ग्वाही 

रामदास कदम म्हणाले की, कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी ज्यावेळी आपल्याकडे होती, त्यावेळी दै. ‘पुढारी’चे सततचे सहकार्य आपल्याला मिळाले. आज पर्यावरणमंत्री म्हणून माझ्याकडे ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव व व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी ज्या समस्या  मांडल्या, त्यासंदर्भात आपण स्वतः काही आदेश दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही, त्यावर दोन महिने आपण मॉनिटरिंग करणार आहोत. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर यासंदर्भात पुन्हा एक बैठकही घेण्यात येईल. पंचगंगा नदी आणि रंकाळ्याची प्रदूषणातून सुटका करण्यासाठी सर्व आवश्यक योजनांना गती दिली जाईल. कोणत्याही कारणांनी हे काम रखडणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. यावेळी आ. उल्हास पाटील, आ. डॉ. सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आदी उपस्थित होते.