Wed, Jun 26, 2019 18:12होमपेज › Kolhapur › शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही : खासदार शेट्टी

शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही : खासदार शेट्टी

Published On: Feb 04 2018 1:51AM | Last Updated: Feb 04 2018 12:19AMदानोळी : वार्ताहर

आम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे  शासन आणि नागरिक यांच्यामधील दुवा आहोत. दोन्ही बाजूचे म्हणणे  ऐकून घेतले आहे. आम्ही शासनाला आमचं मत सांगू. इचलकरंजीला शुद्ध पाणी मिळाले पाहिजेच; पण  शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही. मी जरी लोकप्रतिनिधी असलो तरी चळवळीतला कार्यकर्ता आहे, असे  मत खा. राजू शेट्टी यांनी येथे झालेल्या वारणा बचाव कृती समिती सोबतच्या बैठकीत व्यक्‍त केले.

यावेळी वारणा बचाव कृती समितीतर्फे कोणत्याही परिस्थितीत पाणी देणार नसल्याचे ठणकावण्यात आले. यावेळी कृती समितीतर्फे मानाजीराव भोसले आणि महादेव धनवडे यांनी मते व्यक्‍त केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी इचलकरंजीकरांची 15 वर्षांपूर्वीची कृष्णा योजना कालबाह्य होणे ही हस्यास्पद असल्याचे सांगितले. तरीही त्यांनी  दूधगंगेच्या डाव्या कालव्यातील पाणी हुरीतून उचलणे सोपे असल्याचे सांगितले. बाबासाहेब पाटील-भुयेकर  यांनी वारणेच्या पाण्यावर  काठावरील ग्रामस्थांचा  पहिला हक्‍क आहे. त्यामुळे कोणीही लोकप्रतिनिधींना वेठीस धरून पाण्याचे राजकारण करू नये, असे सांगितले. प. स. सदस्य सुरेश कांबळे यांनी खा. शेट्टी यांना शेतकर्‍यांच्या पाठीशी रहावे, असे आवाहन केले.  

रावसाहेब भिलवडे यांनी पंचगंगा शुद्ध करून पाणी वापरणे हे इचलकरजीसह पंचगंगा काठावरील इतर खेड्यांनाही हिताचे असल्याचे सांगितले. मानाजीराव भोसले,  महादेव धनवडे यांनी लाठ्या-काठ्या खाव्या लागल्या तरी चालतील, पाहिजे तर आम्हाला गोळ्या घाला; पण कोणत्याही परिस्थितीत पाणी देणार नसल्याचे सांगितले. 

यावेळी महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, सरपंच सुजाता शिंदे, उपाध्यक्ष केशव राऊत, शिरोळ तालुका काँग्रेसचे सर्जेराव शिंदे, सावकर मादनाईक, अशोकराव कोळेकर, सतीश मलमे,  किणीचे   सरपंच अण्णासाहेब पाटील आदी उपस्थित होते. स्वागत उपसरपंच गब्रू  गावडे यांनी केले तर आभार सरपंच सुजाता शिंदे यांनी मानले.