Sat, Apr 20, 2019 07:56होमपेज › Kolhapur › राजर्षी शाहूंनी केला होता जगातला पहिला महिला संरक्षणाचा कायदा

राजर्षी शाहूंनी केला होता जगातला पहिला महिला संरक्षणाचा कायदा

Published On: Aug 02 2018 1:58AM | Last Updated: Aug 02 2018 12:23AMकोल्हापूर : विजय पाटील 

होय! बरोबर शंभर वर्षांपूर्वी आजच्या दिवशी राजर्षी शाहू महाराजांनी कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा केला होता. महिलांचा सन्मान करणारा आणि त्यांना संरक्षण देणारा अशाप्रकारचा जगातील हा पहिला कायदा असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. दररोज देशातच नव्हे, तर जगभर महिलांवर अत्याचार वाढत असल्याच्या काळात राजर्षी शाहूंचा महिलांविषयी कृतिशील आदरभाव प्रकट करणारा द‍ृष्टिकोन हा त्यांच्या द्रष्टेपणाचा आणखी एक खणखणीत पुरावा आहे. 

राजर्षी शाहू महाराजांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला कल्याणकारी उंचीवर नेऊन ठेवले आहे. राजेपण हे रयतेसाठी असते, ही आदर्शवाट त्यांच्या कार्यातून आज जगासमोर आहे. सामाजिक समतेसाठी आरक्षणाची अंमलबजावणी, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्‍तीचे, बहुजन समाज शिकावा यासाठी वसतिगृहे, जलनीती  या क्रांतिकारी निर्णयांबरोबरच महिला सबलीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी केलेली प्रत्येक गोष्ट ही चिरंतन आहे. या चिरंतन कार्याच्या शृंखलेतीलच कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा आहे. शंभर वर्षांपूर्वी असा कायदा करून तो अंमलात आणण्यासारखी गोष्ट आजच्या काळातही आश्‍चर्यकारक वाटते. कारण, आपल्याकडे या कायद्यानंतर 86 वर्षांनी म्हणजे 2005 साली अशा पद्धतीचा कायदा करण्यात आला. जगभरातील देशांमध्ये महिलांच्या कायद्याबाबत असाच निरुत्साह दिसून येतो. त्यामुळे या कायद्याची शताब्दी साजरी करणे महत्त्वाचे आहे.

कायद्याची वैशिष्ट्ये... 

2 ऑगस्ट 1918 रोजी हा कायदा करण्यात आला. यामध्ये 11 कलमांचा समावेश करण्यात आला होता. आरोपीस सहा महिन्यांचा कारावास व 200 रुपये दंड अशी तरतूद होती. या कायद्याबाबत राजर्षी शाहूंनी तत्कालीन उदाहरणे देऊन महिलांवर होणार्‍या अन्यायाची पार्श्‍वभूमीही स्पष्ट केली होती.

राजर्षी शाहूंनी प्रत्येक क्षेत्रात कार्याचा ठसा उमटवला आहे. महिलांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी त्यांनी शंभर वर्षांपूर्वी केलेला कायदा अत्यंत व्यापक आहे. हा कायदा तयार करताना महिलांना संरक्षण मिळेल, तसेच त्यांचा आत्मविश्‍वास वाढेल, याची दक्षता घेतल्याचे दिसून येते. शंभर वर्षांपूर्वी असा कायदा करून अंमलबजावणी करणे ही गोष्ट राजर्षी शाहू महाराज हे काळाच्या किती पुढे जाऊन विचार करत असल्याचे उदाहरण आहे. जगातील  असा पहिला कायदा आहे. - डॉ. भारती पाटील, (अधिष्ठाता, शिवाजी विद्यापीठ)